December 23, 2024

*पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी ऑनफिल्ड*

1 min read

• नागरिकांशी संवाद

• प्रशासनाद्वारे त्वरीत उपायोजना

गडचिरोली, जुलै २० : जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे कोणतीही हानी होवू नये व नागरिकांना त्रास होवू नये म्हणून जिल्हाधिकारी संजय दैने यांनी भरपावसात विविध ठिकाणी ऑनफिल्ड उपस्थित राहत प्रशासकीय यंत्रणेकडून आवश्यक उपाययोजना त्वरीत राबवून घेतल्या तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांना दक्षता घेण्याबाबत व मदतीबाबत आश्वस्त केले.
जिल्हाधिकारी दैने यांनी चांदाळा कुंभी, तसेच आरमोरी, वडसा, कुरखेडा तालुक्यात भेट दिली. त्यांनी यावेळी नागरिक व शाळकरी मुलांशी संवाद साधला. नागरिकांनी काळजी घ्यावी, पूलावर पाणी वाहत असतांना घाईगडबडीत पूल ओलांडू नये, विजा चमकत असतांना झाडाखाली उभे राहू नये, मानवी चुकांमुळे कोणतीही जिवीत व वित्त हानी होवू नये याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन केले. तसेच प्रशासकीय यंत्रणेला परिस्थितीवर बारीक नजर ठेवून अलर्ट राहण्याचे व नागरिकांना त्रास होणार नाही याबाबत आवश्यक उपाययोजना नियमितपणे राबविण्याचे निर्देश दिले.
जिल्ह्यात कालपासून तीन दिवसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. तसेच गोसेखुर्द धरणातून मोठा विसर्ग सोडण्यात येणार असल्याची सूचना मिळाली होती. यासोबतच कालपासून अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पूर सदृश परिस्थिती निर्माण होवून वाहतूकीचे अनेक मार्ग काही काळ बंद झाले, काही ठिकाणी नदीकाठच्या घरांमध्ये पाणी घुसले तर काही ठिकाणी रस्त्यावरील मुरूम व गिट्टी वाहून गेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबत जिल्हाधिकारी यांनी त्वरीत दखल घेवून आज पाउस सुरू असतांनाच या भागांना भेट देवून पाहणी केली.
जिल्हाधिकारी संजय दैने यांचेसमवेत उपजिल्हाधिकारी विवेक साळुंखे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे कृष्णा रेड्डी, निलेश तेलतुंबडे, संबंधीत तहसिलदार, पोलिस अधिकारी, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक, स्थानिक आपदा मित्र व नागरिक मदत कार्यासाठी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!