“जि.प. शिक्षकांची शाळेत पोहोचण्यासाठी कसरत; १० किमीचा धोकादायक प्रवास”
1 min readएटापल्ली , जुलै २३: तालुक्यात उच्च दर्जाचा लोह खनिज असल्याने जगाच्या नकाशावर एटापल्ली तालुक्याचे नाव आहे. या तालुक्याची आयरन सीटी अशी ओळख आहे; परंतु तालुका विकासपासून कोसोदूर आहे. एटापल्लीपासून केवळ १० किलोमीटर अंतरावर असलेल्या तांबडा टोलासह अनेक गावांत पावसाळ्यात तांबडा नाल्याच्या कंबरभर पाण्यातून धोकादायक वाट काढावी लागते. विशेष म्हणजे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना पावसाळ्यात शाळेत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.
एटापल्ली-जीवनगट्टा-डोड्डी या गावांनंतर तांबडा टोला गावाला जावे लागते. एटापल्लीवरून तांबडा टोला गावाचे अंतर १० किमी असून, डोड्डी गावापर्यंत पाच कि.मी. अंतराचा डांबरीकरण झालेला पक्का रस्ता भाटे दोदी , गानापने , तांबडा तांबडा(टोला), नारानूर, रेंगावाही, लांझी, ताडपल्ली, एकनसूर या गावांसह अनेक गावे आहेत. या गावांना जाताना डोड्डी नंतर तांबडा नाला पडतो. थोडा जरी पाऊस आला तरी या नाल्यांच्या पाण्याची पातळी वाढते. त्यामुळे डोड्डी पलीकडल्या पाच-सहा गावांतील नागरिकांना पावसाळ्यात नाल्यातून कंबरभर पाण्यातून जीव मुठीत ठेवून धोकादायक वाट काढावी लागते.
रस्ता झाला, पूल केव्हा होणार?
शासन व प्रशासनाचे दुर्गम भागाच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. यावर्षी रस्त्याच्या कामाला सुरवात झाली आहे; परंतु पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. पुलाचे काम केव्हा सुरू होणार? असा सवाल या भागातील नागरिकांनी उपस्थित केला.
“गुरुजींची पायदळ वारी”
तांबडा टोला येथे जिल्हा परिषद शाळा असून पहिली ते चौथीपर्यंत येथे शिक्षणाची सोय आहे अहेरी येथील रहिवासी शिक्षक सुनील मामीडवार हे या शाळेत कार्यरत आहेत. दरवर्षी पावसाळयात या गुरुजींची वाट नाल्याच्या पाण्यातूनच असते.
सदर शिक्षक हे नाल्यातून शाळेपर्यंत पायी जातात. तांबडा टोला या गावात राहण्याची व्यवस्था नसल्याने ते अहेरीवरून अप-डाऊन करतात. त्यांना दररोज या नाल्याच्या पाण्यातून जावे लागते. नाल्यात पाणी असल्याने दुचाकी नाल्यापलीकडे ठेवून नाल्यापासून तांबडा टोलापर्यंत पाच किमी अंतर चालत जावे लागते.