मार्कंडा मंदिराच्या जिर्णोद्धाराला गती देण्याचे निर्देश; ९ कोटींच्या विकासकामांना लवकरच प्रारंभ

गडचिरोली, २५ एप्रिल : गडचिरोली जिल्ह्यातील प्राचीन व ऐतिहासिक मार्कंडा मंदिराच्या जिर्णोद्धाराला गती देण्याचे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी पुरातत्व विभागाला दिले. आज मंदिराला भेट देऊन त्यांनी जिर्णोद्धार व विकासकामांचा आढावा घेतला. मंदिर परिसरातील ९ कोटी रुपयांच्या प्रस्तावित विकासकामांना लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
मार्कंडा मंदिर हे धार्मिक व ऐतिहासिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. सध्या पुरातत्व विभागामार्फत सुरू असलेल्या जिर्णोद्धाराच्या कामाला गती देण्यासाठी अधिक कामगार नियुक्त करण्याचे निर्देश जयस्वाल यांनी दिले. यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, उपविभागीय अधिकारी रणजीत यादव, पुरातत्व विभागाचे शुभम कोरे, एमएसआरडीसीचे श्री. जाधव, तहसीलदार प्रशांत घोरुडे, गट विकास अधिकारी सागर पाटील यांच्यासह महसूल व बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंदिर परिसरात उपस्थित भाविक व स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना जयस्वाल यांनी त्यांच्या भावना जाणून घेतल्या. भाविकांनी मंदिराचे जिर्णोद्धार लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. मंदिराच्या विकासासाठी प्रस्तावित ९ कोटींच्या कामांमुळे परिसराचा कायापालट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कामांमुळे मंदिराचे धार्मिक महत्त्व तर वाढेलच, शिवाय पर्यटनाला देखील चालना मिळेल, असे मत जयस्वाल यांनी मांडले.
मार्कंडा मंदिराच्या जिर्णोद्धारामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि गडचिरोलीच्या सांस्कृतिक वारशाचे जतनहोईल. सहपालकमंत्र्यांच्या या भेटीने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरच मंदिराचा भव्य स्वरूपात विकास होण्याची अपेक्षा आहे.