जागतिक हिवताप दिन: गडचिरोलीत प्रभातफेरीद्वारे जनजागृती

गडचिरोली, २५ एप्रिल : “हिवतापाला संपवू या: पुन्हा योगदान द्या, पुनर्विचार करा, पुन्हा सक्रिय व्हा” या संकल्पनेसह जागतिक हिवताप दिनानिमित्त गडचिरोलीत आज विविध जनजागृती उपक्रम राबवण्यात आले. हिवताप निर्मूलनासाठी नागरिकांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने शहरात प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रभातफेरीला प्रारंभ झाला.
या प्रभातफेरीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचर्या प्रशिक्षणार्थी, आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी हिवतापाविषयी घोषवाक्य देत उत्साहाने सहभाग घेतला. प्रभातफेरी महिला व बाल रुग्णालयात समारोपित झाली. जिल्हा हिवताप कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महिला व बाल रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
डॉ. प्रताप शिंदे यांनी हिवताप रोखण्यासाठी नवीन उपाययोजनांवर मार्गदर्शन केले, तर डॉ. माधुरी किलनाके यांनी रोगाचे प्रतिबंध आणि उपचार याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश कार्लेकर यांनी केले, सूत्रसंचालन अश्विनी ढोडरे यांनी, तर आभार प्रदर्शन संजय समर्थ यांनी केले. हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.
जिल्हा आरोग्य विभागाने नागरिकांना हिवताप आणि डेंग्यू प्रतिबंधासाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या. यात आठवड्यातून एकदा पाण्याची भांडी स्वच्छ करणे, टेमीफॉसचा वापर, पाण्याच्या टाक्यांना झाकण लावणे, घरात पाणी साचू न देणे, पूर्ण बाह्यांचे कपडे घालणे, मच्छरदाणीचा वापर आणि ताप आल्यास त्वरित रक्ततपासणी करणे यांचा समावेश आहे. या उपक्रमाने हिवतापाविरुद्ध जनजागृतीला बळ मिळाले असून, नागरिकांना आरोग्य जपण्याचे आवाहन करण्यात आले.