“वैरागड येथे नालीचे गढूळ पाणी थेट गावातील नळांना; नागरिकांचे आरोग्य धोक्यात”
1 min readवैरागड , जुलै २३ : वैरागड येथे पावसाच्या पाण्याबरोबरच नालीचे पाणीसुद्धा नळाच्या पाण्यात मिक्स होत आहे. या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्राम पंचायतीने वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.
समाज मंदिर ते राजेश खोब्रागडे यांच्या घरापर्यंत त्यांच्या २५ ते ३० फुटाच्या नालीची दुरुस्ती करण्यासाठी कारण नसताना जेसीबी लावून नालीचे खोदकाम करताना नळ योजनेची पाइपलाइन तुटली. यामुळे नालीचे घाण पाणी पाइपलाइनमध्ये जात आहे. त्या पाइपलाइनमधून नळाला आलेले घाण पाणी नागरिकांना वापरावे लागत आहे. पण याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे.
वैरागड येथे या वर्षात वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली. गावांतर्गत नळ योजनेची पाइपलाइन सिमेंट रस्ते फोडून नाल्यांच्या बाजूने टाकण्यात आली. यावेळी अनेक ठिकाणी नाल्या तुटल्या. गावातील अनेक नाल्यांची एक बाजू फुटली आहे. त्याप्रमाणे समाज मंदिर ते राजेश खोब्रागडे यांच्या घरापर्यंत वीस ते पंचवीस फूट तुटलेल्या नालीचे बांधकाम करण्यासाठी जेसीबी लावण्याची कोणतीही गरज नव्हती. मुजरांकरवी हे काम करणे शक्य होते. मात्र केवळ जेसीबीचे बिल जोडण्यासाठी एका ग्रा. पं. सदस्याने जेसीबी लावून नाली खोदकामाबरोबरच पाइपलाइन फोडून टाकली. नालीचे खोदकाम करून १२ दिवसांचा कालावधी उलटला, तरीही पाइपलाइन फुटलेलीच आहे. नालीच्या बाजूच्या घरातील बाथरूमचे घाण पाणी नालीला जाऊन ते पाणी पाइपलाइनमध्ये जाते. पुढे तेच पाणी नळाद्वारे नागरिकांना पुरवले जाते. मागील दहा-बारा दिवसांपासून लोकांना हेच घाण पाणी वापरावे लागत आहे. परंतु, फुटलेल्या पाइपलाइनची दुरुस्ती झालेली नाही.
“पदाधिकाऱ्याला बांधकामाचे कंत्राट”
एका सलग कामाचे तुकडे करून त्या बांधकामाचे कमिशन तत्त्वावर कंत्राट वाटून दिले जाते. कमिशनची जास्ती बोली बोलणाऱ्यालाच बांधकामाचे कंत्राट दिले जाते. समाज मंदिर ते राजेश खोब्रागडे यांच्या घरापर्यंतच्या नाली बांधकामाचे कंत्राटही अशाच पद्धतीने मंजूर करण्यात आले आहे.
काही कामे तर ग्रामपंचायत सदस्यच दुसऱ्याच्या नावाने करतात. फुटलेल्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचा खर्च संबंधित कंत्राटदाराकडून वसूल करावा, अशी मागणी होत आहे. ग्राम पंचायतीचे सदस्य व पदाधिकारीच कामे करतात.