राज्यात सरासरीच्या १२३ टक्के पाऊस; पेरण्या समाधानकारक
1 min readगडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै २३: राज्यात सरासरीच्या १२३.२ टक्के पाऊस झाला असून पेरण्या देखील समाधानकारक झाल्या आहेत. या संदर्भातील सादरीकरण आज कृषी विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत केले.
राज्यात २२ जुलैपर्यंत ५४५ मि.मी. पाऊस झाला आहे. मागील वर्षी याच सुमारास ४२२ मि.मी. म्हणजेच सरासरीच्या ९५.४ टक्के पाऊस झाला होता. राज्यात खरीपाचे ऊस वगळून १४२.२ लाख हेक्टर क्षेत्र असून आतापर्यंत १२८.९४ लाख हेक्टर क्षेत्रावर (९१ टक्के) पेरणी झाली आहे. भात व नाचणी पिकाची पुर्नलागवड कामे सुरु असून ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, तूर, उडीद, मूग, भुईमूग आणि कापसाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. खत आणि बियाणांची पुरेशी उपलब्धता आहे.
*पाणी साठा :*
सध्या राज्यातील सर्व धरणांमध्ये ३९.१७ टक्के पाणी साठा असून गेल्या वर्षी याच सुमारास ४३.६५ टक्के पाणी साठा होता. सर्वात कमी म्हणजे १२.१३ टक्के पाणी साठा छत्रपती संभाजीनगर येथे तसेच २८.३४ टक्के नाशिक येथे आहे. राज्यातील १ हजार २१ गावे आणि २ हजार ५१८ वाड्यांना १ हजार ३६५ टँकर्सद्धारे पाणीपुरवठा सुरु आहे. टँकर्सची संख्या ३२६ ने वाढली आहे.