“दुचाकीसहित नाल्याच्या पुरात वाहून जाताना तिघांना वाचवले; नागरिकांचा प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष
1 min readगडचिरोली, जुलै २५ : आज सायंकाळच्या सुमारास ७ ते ८ दरम्यान चुरचुरा-नवरगाव रस्त्यावरील नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असताना दुचाकी काढण्याचा प्रयत्न करताना तिघे दुचाकीसहित पुराच्या पाण्यात वाहून जात असतांना स्थानिक तैराक व नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करुन वाचविले.
प्राप्त महितीनुसार गडचिरोलीहून नागपूरला जाण्यासाठी निघालेले नागपूर येथील रहिवासी असलेले राहुल किशोर मेंढे वय 32वर्ष, आशा किशोर मेंढे वय 65 व त्याचा भाचा दत्तश्री शरद गोडे वय 12 वर्ष हे तिघे आपल्या दुचाकीने मौजा चुरचुरा-नवरगाव मार्गाने जात असतांना नाल्यावरील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात अडकून काही अंतरावर वाहत गेले. तिघेही नाल्याच्या पाण्यात दुचाकीसहित वाहून जात असल्याची बाब लक्ष्यात आली. वाहून जात असल्याने मदती करिता जवळ असलेल्या लोकांना हाक दिल्याने चुरचुरा येथील तैराक अनिल वामन गेडाम व त्यांचे इतर सहकारी यांनी जीवाची पर्वा न करता त्या तिघांचे प्राण वाचविले. त्यानंतर जिल्हा पथके, तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती गडचिरोली ची चमू तहसीलदार हेमंत मोहरे, मंडळ अधिकारी रुपेश गोरेवार, तलाठी श्रीमती भुरसे यांनी त्यांना गावात आणून कृष्णा रेड्डी, निलेश तेलतुंबडे, CHO, आशा स्वयंसेवक, आपदा मित्र, पोलिस पाटील, कोतवाल यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले व त्यांना गडचिरोली येथे सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले.
सदर घटनेत तिघांचे जीव वाचविण्यात यश आले असून यात मोटरसायकल मात्र पुरात वाहून गेली आहे.
पुलावरून पाणी वाहत असताना कोणतेही वाहन टाकू नये अशा प्रकारच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून वारंवार देण्यात येत आहे. या सूचनांकडे दुर्लक्ष करून आपल्या जीव नाहक धोक्यात घालू नये व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.