“जनसंवादातून सुशासनाकडे : एटापल्ली, सिरोंचा आणि अहेरी या तालुक्यातील जनतेशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद”
1 min readगडचिरोली, जुलै २९ : मागील 12 -13 दिवसा पासून अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाले असून सिरोंचा, भामरागड ही तालुका मुख्यालये आणि अहेरी विभागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे एटापल्ली,सिरोंचा आणि अहेरी या तीनही तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य उपकेंद्र आणि ग्रामस्थांशी ‘जनसंवादातून सुशासनाकडे’ या मोहिमेंतर्गत अहेरीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे थेट संवाद साधून प्रत्यक्ष गाव स्तरावरील परिस्थिती व नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्या जाणून घेतल्या.
श्री भाकरे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित राहण्याबाबत, आरोग्यसेवेसंबंधी आवश्यक कामांसाठी निधीची मागणी करण्याबाबत, रस्ते वाहतूक सुरळीत ठेवणेबाबत व नुकसाणीचे पंचनामे वेळेत पूर्ण करण्याबाबत यंत्रणेला सूचना दिल्या. तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी प्रशासनापुढे व्यक्त करण्याचे आवाहन केले. यावेळी वागेझरी येथील सर्पदंश झालेले रूग्ण बापूराव वासुजी शेंडे वय 56 वर्ष तसेच आश्रमशाळा कोटमी येथील पोटात दुखत असल्यामुळे भरती झालेले अनिल माझी कवडो वय.15 वर्ष या दोन रुग्णांशी व छत्तीसगड सीमेवरील कल्लेड, ता. अहेरी येथील जनतेशी थेट संवाद साधण्यात आला.