ठाणेगाव येथे भरदिवसा जबरी चोरी ; तीन चोरट्यांनी पळविला चार लाखांचा ऐवज
1 min readआरमोरी , जुलै ३० : येथून जवळच असलेल्या नवीन ठाणेगावच्या बस थांब्याजवळील एका सेवानिवृत्त परिचारिकेच्या भरदिवसा जबरी चोरी होण्याची घटना सोमवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. चोरट्यांनी चक्क त्या घरमालकीनीला खुर्चीला बांधून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि त्यांचा मोबाईल असा सुमारे चार लाखांचा ऐवज पळविला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
संपदा नानाजी काळबांधे (59 वर्ष) असे तक्रारकर्त्या सेवानिवृत्त परिचारिकेचे नाव आहे. त्या घरात एकट्याच राहात होत्या. तोंडाला रूमाल बांधून आलेल्या तीन तरुण चोरट्यांनी ही लुटमार केली. त्यांच्याविरूद्ध कलम 309 (4), 332 (क), 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरट्यांनी सुरूवातीला काळबांधे यांना पैशाची मागणी केली. सेवानिवृत्तीमुळे पैसा आलेला असेल, तो पैसा दे असे म्हणत चोरट्यांनी पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. पण काळबांधे यांनी प्रतिसाद न दिल्याने चोरट्यांनी त्यांना खुर्चीत बसवून हात-पाय बांधले. शिवाय ओरडू नये म्हणून तोंडात दुपट्टा कोंबून तो बांधला. चोरटे गेल्यानंतर त्यांनी कशीबशी स्वत:ची सुटका केली. याप्रकरणी आरमोरी पोलिस अधिक तपास करत आहेत.