“राशन दुकानात अंगठा लागत नाही? चिंतनको, रास्त भाव दुकानदारांना ऑफलाईन अन्नधान्य पुरवठा करण्यास शासनाची मान्यता”
1 min read“आ. कृष्णा गजबे यांच्या पाठपुराव्याला यश”
गडचिरोली न्यूज़ नेटवर्क , जुलै ३१: (देसाईगंज) : राज्यासह गडचिरोली जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेत नागरिकांना रास्त भाव दुकानातून ई-पॉस मशीनद्वारे अन्नधान्य वाटप करण्यात येत असते. परंतु मागील काही दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे रास्त भाव दुकानदारांना ई-पॉस मशीन द्वारे अन्नधान्य वाटप करताना समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे माहे जुलै महीना संपत आला असताना नागरिकांना अन्नधान्य मिळालेले नाही. आरमोरी मतदार संघासह संपूर्ण गडचिरोली जिल्हा आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त असुन कोणतेही मोठे उद्योग, व्यवसाय नसल्याने नागरिक मोठ्या संख्येने मजुरीवर अवलंबून आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना राशन दुकानातुन मिळणाऱ्या अन्नधान्यावर अवलंबून राहावे लागते.
तथापि ई-पॉस मशीनच्या तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांना अन्नधान्या अभावी उपासमारीची पाळी ओढवण्याची शक्यता निर्माण झाल्याची बाब आमदार कृष्णा गजबे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव यांच्याशी संपर्क साधून उद्भवलेली समस्या निदर्शनास आणून देत रास्त भाव दुकानदारांना ई-पॉस ऐवजी ऑफलाईन अन्नधान्य पुरवठा करण्यास परवानगी देण्याची मागणी केली. सदर मागणीच्या अनुषंगाने ३० जुलै २०२४ च्या संकिर्ण-२०२४/प्र.क्र.११९/सं.क. नुसार रास्त भाव दुकानदारांना ऑफलाईन अन्नधान्य वाटप करण्यास मान्यता दिली आहे. तरी रास्त भाव दुकानदारांनी शासन परिपत्रक व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या सुचनेनुसार माहे जुलै २०२४ चे अन्नधान्य नागरिकांना वाटप करण्याचे आवाहन केले. जलद प्रतिसाद देत नागरिकांच्या समस्येचे शासनाने निराकरण करुन दिलासा दिल्याबद्दल आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्न, नागरी पुरवठा मंत्री यांच्यासह अन्न नागरी पुरवठा विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांचे आभार मानले.