December 23, 2024

“मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत राज्यातील प्रथम लाभार्थी गडचिरोली जिल्ह्यातून असल्याचा अभिमान” – अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम

1 min read
  • सर्वाना समान न्याय व समान मदत देण्याची शासनाची भूमिका
  •  शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

गडचिरोली न्यूज़ नेटवर्क, ऑगस्ट 2 : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत राज्यातून प्रथम लाभार्थी गडचिरोली जिल्ह्यातून निवड झाल्याचा जिल्ह्यावासियांना अभिमान आहे. या योजनेसह राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.
जिल्हा नियोजन सभागृह येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कार्यशाळेचे उद्घाटन मंत्री आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते मार्गदर्शन करत होते. जिल्हाधिकारी संजय दैने, गोंडवाना विद्यापीठाचे प्रकुलगुरू श्रीराम कावळे, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वाना समान न्याय व समान मदत देण्याची शासनाची भूमिका असून यासाठी राज्य शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. यात महिला आत्मनिर्भर व्हाव्या म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली. या योजनेत बारावी पास उमेदवारास 6 हजार, पदविकाधारकास 8 हजार आणि पदवीप्राप्त उमेदवारास 10 हजार रुपये मासिक विद्यावेतन देवून त्यांना 6 महिन्यांचा कार्य अनुभव या देण्यात येणार आहे. यासोबतच बळीराजा वीज सवलत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोफत वीज, अन्नपूर्णा योजनेतून गॅस सिलेंडर, महिलांना मोफत उच्च शिक्षण, ज्येष्ठासाठी वयोश्री योजना आणि तिर्थदर्शन योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजना जिल्ह्याच्या दुर्गम भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न करण्याचे व नागरिकांनी सर्व योजनांचा लाभ घेण्याचे असे मंत्री आत्राम यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी संजय दैने यांनी प्रशिक्षणार्थींनी काटेकोरपणे प्रशिक्षण पूर्ण करून भावी आयुष्यात पुढील कामासाठी या अनुभवाच्या संधीचा उपयोग करण्याचे आवाहन केले.
जिल्ह्यात विविध आस्थापनेवर निवड झालेल्या 51 प्रशिक्षणार्थींचा धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यशाळेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनंतर्गत महास्वयम पोर्टलवर पदे अधिसूचित करणे व उमेदवार नोंदणीची प्रक्रियेबाबत मार्गदर्शन तज्ञाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला विविध शासकीय कार्यालय, महामंडळ, सहकारी बँका व औद्योगिक आस्थापनांचे प्रमुख उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!