नगर परिषद व नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ द्यावा; कर्मचाऱ्यांचे आमदारांना निवेदन
1 min readगडचिरोली न्यूज नेटवर्क, ऑगस्ट ०८ , (चामोर्शी) : नक्षलग्रस्त भागातील नगर परिषद व नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी चामोर्शी नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.
याबाबत ३ ऑगस्ट रोजी आमदार डॉ. देवराव होळी यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग निर्णय दि. २९ फेब्रुवारी २०२४ नुसार आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना देय असलेल्या एकस्तर पदोन्नती वेतनश्रेणीच्या लाभाबाबत स्पष्टीकरणात्मक सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील नगर परिषद/नगर पंचायती वगळता इतर सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांना ही वेतनश्रेणी लागू आहे. त्या अनुषंगाने हा लाभ जिल्ह्यातील नगर परिषदा/नगर पंचायतींमधील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आ. डॉ. होळी यांनी आश्वासन दिले.
सेवानिवृत्तीच्या लाभात येतो फरक
एकस्तर वेतन श्रेणी लागू न केल्यास सेवानिवृत्तीच्या लाभात बराचसा फरक येतो. कर्मचाऱ्यांवर आर्थिक अन्याय होत असल्याने हा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे, असे नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे. दरम्यान यावेळी विस्तृत चर्चा करण्यात आली.