“वांडोली चकमकीत १२ नक्षलवाद्यांचा मृत्यू जिव्हारी; पत्रक काढून राज्य सरकारवर जिल्ह्याची अफाट नैसर्गिक संपत्ती लुटत आल्याचा नक्षल्यांचा आरोप”
1 min readगडचिरोली न्यूज़ नेटवर्क , ऑगस्ट ११ : १७ जुलै रोजी एटापल्ली तालुक्यातील जारावंडी पोलीस हद्दीत येणाऱ्या वांडोली गावानजीक पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक उडाली होती. यात तीन मोठ्या नेत्यांसह कसनसूर, कोरची, टिपागड, चातगाव दलमलचे १२ नक्षलवादी ठार झाले होते. या चकमकीनंतर उत्तर गडचिरोलीतील नक्षलवादी चळवळ संपुष्टात आल्याचे पोलिसांनी जाहीर केले होते. त्यानंतर तब्बल २३ दिवसांनी नक्षलवाद्यांच्या पश्चिम सब झोनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने १० ऑगस्ट रोजी पत्रक जारी केले आहे.
यामध्ये चकमकीत ठार झालेल्या १२ नक्षलवाद्यांच्या नावाचा त्यांच्या मूळ पत्त्यासह संघटनेतील पदाचा ही उल्लेख करण्यात आला आहे. सोबतच या चकमकीवर प्रश्न उपस्थित करून राज्य सरकारला लक्ष्य केले आहे.
केंद्रातील सत्ताधारी ब्राह्मणी हिंदुत्ववादी फॅसिस्ट सरकारने जारी केलेल्या प्रतिक्रांतीवादी आणि दडपशाही सूरजकुंड धोरणात्मक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या ‘ऑपरेशन कागर’चा एक भाग आहे. हे हत्याकांड म्हणजे केंद्रातील आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजपच्या डबल इंजिन बुलडोझर सरकारने घडवलेले घृणास्पद हत्याकांड आहे असा गंभीर आरोप केलेला आहे.
येथील क्रांतिकारी चळवळ संपवून दंडकारण्यातील गडचिरोली जिल्ह्याची अफाट नैसर्गिक संपत्ती देशी-विदेशी कॉर्पोरेट्सच्या ताब्यात देण्याच्या उद्देशाने उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपच्या फॅसिस्ट सरकारचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तहसीलच्या वडलपेठा गावात लोहा प्रखलप स्टील प्लांटचे भूमिपूजन करण्यासाठी लोक एकत्र आले होते. या अंतर्गत आमच्या गडचिरोली जिल्ह्यातील १२ क्रांतिकारकांची आणि आदिवासींची 17 जुलै रोजी जंगलात हत्या केली. असा गंभीर आरोप करत या चकमकीची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी ही पत्रकात नमूद केलेली आहे.
या पत्रकामध्ये संस्था आणि सार्वजनिक अधिवक्ता, प्रसारमाध्यमे आणि कर्मचाऱ्यांना आवाहन करत त्यांनी घटनास्थळी जाऊन वस्तुस्थिती जगासमोर मांडावी आणि मृतक नक्षल्यांना आदरपूर्वक अंत्यसंस्कार देण्यात मदत करावी असे आव्हान ही केलेले आहे.
सूड घेण्याची धमकी
वांडोली चकमकीत १२ नक्षलवाद्यांचा झालेला मृत्यू नक्षलवाद्यांच्या चांगला जिव्हारी लागला आहे. गेल्या काही वर्षांपासून गडचिरोली पोलिसांनी केलेल्या आक्रमक नक्षलविरोधी कारवायामुळे हिंसक नक्षलवादी चळवळीची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली आहे. त्यामुळे बिथरलेल्या नक्षल नेत्यांनी सूड घेणार, अशी धमकी पत्रकातून दिली आहे.
नैराश्यातून तथ्यहीन आरोप – पोलीस अधीक्षक
वांडोली चकमकीनंतर काही दिवसातच मृत नक्षलवाद्यांच्या नातेवाईकांशी संपर्क करण्यात आला. आतापर्यंत नऊ नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलीस विभागाने त्यांच्या घरच्यांना स्वखर्चातून सन्मानजनकपणे सुपूर्द केले आहे. उर्वरित तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह छत्तीसगडमधील असून त्यांच्या नातेवाईकांना संपर्क करण्यात आला आहे. त्यांचा निरोप येताच हे मृतदेहदेखील पोहोचवून देण्यात येतील. चारही बाजूने झालेल्या कोंडीमुळे नक्षलवादी निराश झाले असून त्यातूनच तथ्यहीन आरोप करीत आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केले आहे.