“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ चा लाभ कायमस्वरूपी सुरू राहणार, १७ ऑगस्ट रोजी दोन्ही महिन्यांचे हप्त्यांचे वितरण होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे”
1 min readधुळे, ऑगस्ट १० : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ मुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत, त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. येत्या १७ ऑगस्ट रोजी महिलांच्या बॅंक खात्यात जुलै, ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे हप्ते वितरित करण्यात येतील. यानंतर अर्ज करणाऱ्या महिलांना एकाचवेळी तीन महिन्यांचे साडेचार हजार रूपये दिले जाणार आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे महिला सक्षमीकरण मेळाव्यात महिला-भगिंनीना आश्वस्त केले.
धुळे जिल्ह्यातील भाडणे (ता. साक्री) येथे आज मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते भाडणे (ता.साक्री) येथील नवीन १०० खाटांच्या नवीन उपजिल्हा रुग्णालय तसेच एकलव्य मॉडेल निवासी शाळेच्या इमारतीचे ई – भूमिपूजन तसेच विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या महिलांच्या सक्षमीकरणाच्या विविध योजनांच्या माहितीपुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, आमदार सर्वश्री किशोर दराडे, आमश्या पाडवी, जयकुमार रावल, श्रीमती मंजुळा गावित, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील आदी उपस्थित होते.