“बिकट परिस्थितीवर मात करत महेंद्र कचलाम यांनी शारीरिक शिक्षण विषयातून सेट परीक्षा उत्तीर्ण केली”
1 min readकुरखेडा, ऑगस्ट ११: दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री गोविदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय कुरखेडा माजी विद्यार्थी महेंद्र कचलाम याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ द्वारे आयोजित शारीरिक शिक्षण
विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण केली. गडचिरोली जिल्हा अंतर्गत कुरखेडा तालुक्यातील अतिदुर्गम मोहगाव वाकडी आदिवासी अशा गावात राहणाऱ्या, अत्यंत गरीब आदिवासी कुटुंबातील मुलाने अनेक संकटांना सामोरे जाऊन हे यश संपादन केले. लहानपणीच पितृ व मातृछत्र हरपलेला हा विद्यार्थी गडचिरोली जिल्ह्यात शारीरिक शिक्षण विभागात सेट उत्तीर्ण करणारा पहिला आदिवासी विद्यार्थी ठरला आहे. आश्रम शाळेत आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण करून पदवीचे शिक्षण श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयात विज्ञान शाखेत पूर्ण केले. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी नागपूर, येथून बीपीएड व नंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथून एम. पी. एड. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. श्री गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयात असताना अॅथलेटिक्स स्पर्धेत ऑल इंडिया व ओपन नॅशनल स्पर्धेत दोनदा भाग घेतलेला होता. याच महाविद्यालयातून खो-खो स्पर्धेत राज्यस्तरीयरावर त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. माझ्या यशात प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे आणि महाविद्यालयाचा शारीरिक शिक्षण विभाग यांचे मोलाचे योगदान आहे. खेळाची आवड व संधी मुनघाटे महाविद्यालयातून मिळाली असे आवर्जून महेंद्र कचलाम यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले. आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक प्राध्यापक तथा विभाग प्रमुख डॉ. विवेक मुरकुटे आणि पालक यांना दिले आहे.