“मुक्तिपथ गाव संघटना व ग्रामसभेच्या पुढाकाराने चन्नाबोडी गावातील घरगुती दारू हद्दपार”
1 min readएटापल्ली, ऑगस्ट ११ : घरगुती दारूमुळे सुद्धा व्यसनाचे प्रमाण वाढते, ही बाब लक्षात येताच मुक्तिपथ गाव संघटना, ग्रामसभेच्या पुढाकारातून ग्रामस्थांनी लग्न, सण, उत्सवाला वापर होणाऱ्या घरगुती दारूची परंपरा मोडीत काढली. यामुळे एटापल्ली तालुक्यातील चन्नाबोडी गावातील व्यसनाचे प्रमाण कमी झाले असून मागील दोन वर्षांपासून गावातून दारू पूर्णतः बंद झाली आहे.
एटापल्ली तालुक्यातील जारावंडी ग्रामपंचायत अंतर्गत येणारे चन्नाबोडी हे गाव तालुका मुख्यालयापासून ६२ किमी अंतरावर आहे. गावात सण, उत्सव किंवा लग्न समारंभ असल्यास घरीच असलेल्या मोहफुलाची दारू गाळून वापर करणे ही परंपरा कित्येक वर्षांपासून चालत आलेली होती. यामुळे बरेच नागरिक व्यसनाधीन झाल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत होत्या. गावात ग्रामसभा असली तरी गावातील लोक दारू पिऊन गोंधळ घालीत असत. गावातीलप्रश्न योग्यरीत्या मांडले जात नव्हते व सविस्तर चर्चा होत नव्हती. अशातच मुक्तिपथ गाव संघटनेची स्थापना करून बैठक घेण्यात आली. यामध्ये अवैध दारू व घरगुती दारू या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. पेसा ग्रामसभा घेऊन गावात घरगुती दारू बंद करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला. गावात कोणीही घरगुती दारू वापरासाठी किंवा लग्न, मरण, सण, उत्सवाकरिता काढणार नाही असा वटहुकूम काढण्यात आला.
गावात प्रत्येक मंगळवारी आयोजित पोलोत हा निर्णय टिकवून ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या जातात. मागील दोन वर्षांपासून या गावाने घरगुती दारूची परंपरा मोडीत काढत आनंदाने जीवन जगत आहेत.