“जिल्ह्यातील रेशीम शेतीतून लक्षाधीश झालेल्या शेतकऱ्यांचा नागपूरात गौरव”
1 min readगडचिरोली , ऑगस्ट १२ : तुती आणि टसर रेशीम उद्योगातून एका वर्षात 1 लाखपेक्षा जास्त आर्थिक उत्पन्न घेणाऱ्या गडचिरोलीच्या यशस्वी शेतकऱ्यांना नुकतेच नागपूर येथे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटीच्या यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
वस्त्रोद्योग विभाग आणि रेशीम संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथे 10 व्या राष्ट्रीय हातमाग दिवसाचे औचित्य साधुन सन 2022-23 यावर्षात प्रती एकरी रुपये 1 लक्ष पेक्षा जास्त उत्पन्न मिळवणाऱ्या प्रथम तीन रेशीम शेतकऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातून प्रथम पुरस्कारासाठी सौ. लता व किशोर रामकृष्ण मेश्राम, रा. बोरीचक, द्वितीय पुरस्कारासाठी सौ. रेखा व हिरामन नक्टु डोंगवार रा. इंजेवारी, तृतीय पुरस्कारासाठी सौ. यशोदा व विलास देवराव शिवूरकार रा. देऊळगांव, ता. आरमोरी, या दाम्पत्यांचा प्रथम पुरस्कारासाठी रु.11 हजार, द्वितीय पुरस्कारासाठी रु.7500 व तृतीय पुरस्कारासाठी रु.5000 रोख रक्कम शाल, श्रीफळ, साडी आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रेशीम शेतकऱ्यांची आस्थेने चौकशी करुन रेशीम शेतीतून यश कशा पद्धतीने मिळवले आणि रेशीम शेती कशी फायद्याची आहे हे जाणून घेतले. रेशीम शेतकऱ्यांसाठी बाजार पेठ आणि इतर सोयी सवलती उपलब्ध करुन देण्यात येतील असे त्यांनी आश्वासित केले.
कार्यक्रमाला वस्त्रोद्योग विभागाचे आयुक्त अविष्यांत पंडा, रेशीम संचालनालयाच्या संचालिका वसुमना पंत, अतिरिक्त विभागीय आयुक्त माधुरी चवरे-खोडे, वस्त्रोद्योग उपायुक्त श्री जोशी उपस्थित होते.