“कोरची मुख्य रस्त्याची समस्या मार्गी लावा मनोज अग्रवाल यांची खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्याकडे मागणी”

कोरची, ऑगस्ट १३ : तालुक्याचे ठिकाण असलेल्या कोरची येथील कोचीनारा ते आश्रमशाळेला जाणारा रस्ता हा जिल्हा परिषद बांधकाम विभागाअंतर्गत येत असून सदर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना याचा फटका बसत असून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष घालावे व तत्काळ या रस्त्याचे बांधकाम सुरू करण्याकरिता शासन दरबारी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्याकडे कोरची तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज अग्रवाल यांनी दिल्ली येथे भेट घेऊन केली. सदर समस्येच्या निराकरणासाठी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी यावेळी दिले.
कोरची येथील मुख्य रस्त्यावर दरवर्षी पावसाळयात मोठमोठे खड्डे पडतात. यामुळे या परिसरात अनेक दुर्घटना सुद्धा घडत असतात. मागील काही वर्षांपासून या रस्त्यावर लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे.
मुख्य म्हणजे कोरची हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे परिसरातील नागरिक दररोज कोरची येथे शासकीय कामासाठी तसेच बाजार पेठेतील कामांकरिता येत असतात. परंतु या खड्यांमुळे त्यांना सुद्धा मनस्ताप सहन करावा लागतो. शहरातील हा मुख्य रस्ता असल्यामुळे याच रस्त्याने शाळकरी विद्यार्थी सुद्धा शाळेत जातात.