“गडचिरोलीच्या दुर्गम भागापर्यत शासकीय योजनेचा लाभ पोहचला ही शासन व प्रशासन मनापासून काम करत असल्याची फलश्रुती , मुख्यमंत्र्यांनी साधला गडचिरोलीत संवाद”
1 min readगडचिरोली ऑगस्ट १५ : गडचिरोलीच्या आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागापर्यंत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ पोहचला. शासकीय योजना सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी शासन व प्रशासन मनापासून काम करत असल्याची ही फलश्रुती असून याचा मला आनंद आहे या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय योजना प्रभावीपणे राबवित असल्याबद्दल प्रशासनाचे कौतुक आणि अभिनंदन केले.
शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ व ‘मुख्यमंत्री युवा कार्य योजने’च्या लाभार्थींशी मुख्यमंत्री यांनी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. गडचिरोलीतून जिल्हाधिकारी संजय दैने यांचे उपस्थितीत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची राज्यातील पहिली लाभार्थी सोनाली गेडाम यांनी मुख्यमंत्री यांचेकडे मनोगत व्यक्त केले. कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी चेतन हिवंज, शिक्षणाधिकारी बी.एस. पवार, बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती कडू याप्रसंगी उपस्थित होते.
सोनाली गेडाम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी संवाद साधतांना ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ काढल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांना धन्यवाद दिले व राज्याची प्रथम लाभार्थी होण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. प्रशिक्षणार्थी अनुभवाचा लाभ नोकरीसाठी आणि विद्यावेतनाचा लाभ पुढील शिक्षणासाठी होईल, असेही त्यांनी सांगितले.