“अंबिकापूर-गडचिरोली नवीन रेल्वे मार्ग मंजूर; सिरोंचा , अहेरी तालुका मार्गे रेल्वे जाणार”
1 min readदेसाईगंज , ऑगस्ट १८ : कोरबा-अंबिकापूर आणि गडचिरोली ते बचेली (मार्गे-विजापूर) या नवीन रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्वेक्षणाच्या मंजुरी देण्यात आली आहे. या मार्गांवर रेल्वे सुरू झाल्याने गडचिरोली जिल्ह्याचे दक्षिण भाग रेल्वेच्या नकाश्यावर येवून विकास कामांत हातभार लागणार आहे.
या बाबत घोषणा करताना केंद्रीरेल्वे मंत्री श्री अश्वनी वैष्णव म्हणाले की, छत्तीसगड हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे. सध्या, छत्तीसगडमध्ये 37,018 कोटी रुपये खर्चाच्या 2,731 किलोमीटरच्या 25 नवीन रेल्वे लाईन प्रकल्पांवर काम सुरू आहे. जेव्हा रेल्वे ट्रॅकवर गाड्या चालवल्या जातात आणि त्याच वेळी नवीन ट्रॅक बांधणे, नवीन स्थानक बांधणे, रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास आणि यार्डचे नूतनीकरण यांसारखी रेल्वे पायाभूत सुविधांशी संबंधित विविध कामे केली जातात, तेव्हा सुरळीत कामकाजात अनेक अडचणी येतात. गाड्यांच्या समस्या समोर येतात. त्यामुळे अनेक वेळा गाड्या रद्द कराव्या लागतात. पण छत्तीसगडमध्ये शक्य तितक्या लवकर जागतिक दर्जाच्या रेल्वे पायाभूत सुविधा निर्माण करून राज्यातील लोकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा आणि अधिकाधिक गाड्या चालवण्याचा आमचा संकल्प आहे.
रेल्वे मंत्री पुढे म्हणाले की, छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री विष्णुदेव साई जी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अरुण साओ जी आणि उपमुख्यमंत्री श्री विजय शर्मा जी यांची भेट झाली. यावेळी त्यांनी राज्यातील रेल्वेशी संबंधित अनेक प्रकल्पांची मागणी केली होती. त्यापैकी 670 किलोमीटरच्या दोन नवीन रेल्वे लाईन प्रकल्पांच्या डीपीआरला (16.75 कोटी रुपये) आज मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये 180 किमी लांबीच्या कोरबा आणि अंबिकापूर नवीन रेल्वे लाईन प्रकल्पाचा DPR (रु. 4.5 कोटी) आणि 490 किमी लांबीच्या गडचिरोली-बचेली मार्गे विजापूर नवीन रेल्वे लाईन प्रकल्पाचा DPR (रु. 12.25 कोटी) यांचा समावेश आहे.
छत्तीसगड राज्यात रेल्वेचे जाळे विणण्याचा भारतीय रेल्वेचा निर्धार आहे. या वर्षी छत्तीसगडमधील रेल्वे विकासासाठी केंद्र सरकारकडून 6,922 कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद करण्यात आली आहे. जे 2009 ते 2014 या कालावधीत छत्तीसगडला दरवर्षी वाटप केलेल्या 311 कोटी रुपयांच्या सरासरी बजेटपेक्षा जवळपास 22 पट जास्त आहे.