तरुणीस अमानुषपणे मारहाण करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक, पोलीस कोठडीत रवानगी
1 min readआरमोरी , ऑगस्ट २० : येथील वडसा टी-पॅाईंटजवळच्या शिवम रेस्टॅारंटमध्ये काम करणाऱ्या 19 वर्षीय युवतीला रेस्टॅारंटच्या काऊंटरवरून खेचून अमानुषपणे मारहाण करणाऱ्या दोन आरोपींना अखेर आरमोरी पोलिसांनी सोमवारी (दि.19) अटक केली. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली आहे.
या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. मोबाईलचे चार्जर दिले नसल्याच्या क्षुल्लक कारणावरून आरोपी सोहेल मेहमूद शेख आणि अब्दुल अयुब नासिर शेख यांनी रेस्टॅारंटच्या काऊंटरवर बसलेल्या प्रियंका रॉय या युवतीला बेदम मारहाण केली होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला. दि.15 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 दरम्यान घडलेल्या या घटनेची तक्रार 17 ऑगस्ट रोजी युवतीने केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यामुळे फरार झालेल्या आरोपींना हवालदार विशाल केदार यांनी दि.19 ला अटक करून न्यायालयात हजर केले. दोन्ही आरोपींना 21 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. अधिक तपास आरमोरी स्टेशनचे ठाणेदार विनोद रहांगडाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष कडाळे करीत आहे.