December 23, 2024

उमेद महिला बचतगट अभियानातील बहिणींचे वर्षा शासकीय निवासस्थानी रक्षाबंधन

1 min read

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बांधल्या राख्या, औक्षणामुळे मंगल वातावरण

मुख्यमंत्र्यांसाठी एक कोटी राख्यांचा संकल्प, राज्यातील बहिणींची कृतज्ञता

मुंबई, ऑगस्ट १९: – “माझ्या बहिणी राज्याच्या विकासात मोठं योगदान देतात. त्यांना आधार देण्यासाठी जे जे करता येईल ते करेन. आमची ताकद जसशी वाढत जाईल, तशी आर्थिक मदतही वाढवली जाईल,”असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे राज्यातील बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच रक्षाबंधनापुर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील दोन हप्ते जमा करण्याचा निर्धारही पूर्ण केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील उमेद अभियानातील महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी पोहचून, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे औक्षण करून, राख्या बांधल्या. शेकडो बहिणींच्या औक्षण आणि रक्षाबंधनामुळे वर्षा निवासस्थानी मंगल आणि रक्षाबंधनाचे आगळे उत्साही वातावरण होते.

राज्यातील ४० हजार गावांतून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना एक कोटी राख्या पाठविण्यात येणार आहे. या संकल्पाची सुरवात आज वर्षा निवासस्थानी झाली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ही केवळ रक्षाबंधनाची ओवाळणी नाही, तर माहेरचा कायमचा आहेर आहे. मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचे दोन हप्ते रक्षाबंधनापुर्वी माझ्या बहिणींच्या खात्यात जमा व्हावेत, असा आमचा प्रय़त्न होता, तो शब्द आम्ही पाळला. राज्यातील १ कोटी ४ लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. अन्य महिलांच्या खात्यातही हळू हळू आधार सिंडींग आणि तांत्रिक बाबी पूर्ण होताच, पैसे जमा होतील. यातून माझ्या बहिणींच्या संसाराला थोडाफार आर्थिक हातभार लागेल, ही आमची भावना आहे, असेही ते म्हणाले.

उमेद अभियानामुळे राज्यात ८४ लाख महिला बचतगटांच्या चळवळीशी जोडल्या गेल्या आहेत. ही संख्या देखील १ कोटीवर न्यायची आहे, सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, आपण सगळ्या बहिणी राज्याच्या विकासात मोठं योगदान देत आहात. तुमच्या उत्पादनांनाही चांगली बाजारपेठ मिळावी असे आमचे प्रयत्न आहेत. मोठमोठ्या मॉलमध्ये, अमेझॉन, फ्लिपकार्ट या प्लटफॉर्मवरही आपली उत्पादने विकली जावीत, यासाठी आमचे प्रय़त्न सुरु आहेत. बसस्थानकावर आपल्या स्टॉल्स जागा मिळावेत, असे निर्देश दिलेच आहेत. विमानतळ आणि रेल्वे स्थानकाबाबत केंद्रांशी संपर्क साधून आहोत. उमेद अभियानातील महिला बचत गटांच्या चळवळीला बळकट करण्यासाठी विशेष बैठक बोलावून उपायोयनजा करण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बहिणीनी असेच आमच्या पाठिशी राहावं, सरकारची ताकद जसजशी वाढत जाईल, तसतसे या योजनेतील निधीही वाढवला जाईल. आपण बहिणींनीही आम्हाला ताकद द्यावी असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या योजनेला बदनाम करणारे, फसवी योजना म्हणणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले. तसेच महिलांसाठी, मुलींसाठी राबवण्यात येणाऱ्या अन्नपूर्णा योजना, लेक लाडकी, लखपती दिदी या योजनांची माहितीही त्यांनी दिली.

यावेळी उपस्थित भगिनींनी औक्षण करून, मुख्यमंत्र्यांना राख्या बांधल्या. वर्षा शासकीय निवासस्थानी कार्यरत महिला पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही मुख्यमंत्र्यांना राख्या बांधल्या. याचवेळी एका महिला भगिनीने आपण परभणी येथून आले असल्याचे सांगून मुख्यमंत्री भाऊराया प्रमाणे आपल्या पाठीशी उभे राहिल्याचा आनंद झाल्याचे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनीही या बहिणींचे फुलांच्या पाकळ्यांनी स्वागत केले. मुख्यमंत्र्यांचे वर्षा हे निवासस्थान आलेल्या या सर्व बहिणींचे असल्याची भावनाही व्यक्त केली.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री दिलीपमामा लांडे, संजय शिरसाट तसेच श्रीमती ज्योती वाघमारे आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!