December 23, 2024

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय’ आणि ‘उत्कृष्ट ग्रंथमित्र’ पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

1 min read

गडचिरोली, ऑगस्ट 26: महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयांकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा उपलब्ध व्हाव्यात, वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार’ तसेच, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने ‘डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार’ देण्यात येतो.

राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील “अ” “ब” “क” “ड” वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रुपये १ लाख, ७५ हजार, ५० हजार आणि २५ हजार रुपये तसेच सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथभेट आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात येते.

राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रुपये 50 हजार तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रुपये २५ हजार व सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथभेट आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात येते.

सन २०२३-२४ या वर्षीच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालये, कार्यकर्ते व ग्रंथालय सेवक यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 26 ऑगस्ट 2024 ते 25 सप्टेंबर 2024 या कालावधीत तीन प्रतीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सु.श्री. गजभारे यांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!