गडचिरोलीत अवैध दारू विक्रेत्याच्या घरात सापडली तब्बल २१ लाखांची रोकड: आरोपी फरार
1 min readगडचिरोली, सप्टेंबर ५: स्थानिक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नवेगाव येथील स्वप्निल ऊर्फ शुभम शेंडे नामक दारू विक्रेत्याच्या घरात दारू लपवून ठेवल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या घरावर धाड टाकली असता, हजारो रुपयांची देशी दारू तसेच सुमारे २१ लाख ८० हजार २४० रुपयांची रोकड आढळून आली. पोलिस संपूर्ण रक्कम व दारू असा एकूण २१ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, दारू विक्रेता स्वप्निल शेंडे हा फरार झाला. गडचिरोली पोलिसांनी ही कारवाई तान्हा पोळ्याच्या दिवशी मंगळवारी केली.
ही कारवाई पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक दीपक चव्हाण, महिला पोलिस उपनिरीक्षक आरती सासवडे, पोलिस हवालदार पोल्लेलवार, स्वप्निल कुडावले, महिला पोलिस कर्मचारी वाचामी, बडे, मेश्राम, भुसारी आदींनी केली. दरम्यान, पोलिसांना पाहून आरोपीने पलायन केले. मात्र, चित्रीकरणात टाळे तोडून पोलिसांनी घरझडती घेतली.
लाखोंची रक्कम आली कुठून?
स्वप्निल शेंडे याच्या घरात दारूसाठा असल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक त्याच्या घरी पोहोचले. मात्र, घराच्या दरवाजाला कुलूप होते. दरम्यान, घरासमोर बसलेल्या यशोदा शेंडे नामक महिलेची चौकशी केली असता तिने घर आपल्या मालकीचे असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी पंचांसमक्ष दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तपासादरम्यान पोलिसांना २१ लाख ८० हजार २४० रुपयांची रोख रक्कम सापडली. या रकमेत ५००, २००, १००, ५० आणि २० रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. दारू विक्रेत्याच्या घरात एवढी मोठी रक्कम आली कुठून? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहे.
सराईत आरोपी, याआधी सहा गुन्हे
स्वप्निल शेंडे याच्या घरावर केलेल्या कारवाईदरम्यान स्वप्निल घराबाहेर होता. घरातून लाखो रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केल्याची माहिती मिळताच स्वप्निल फरार झाला. त्याच्यावर दारूतस्करीचे सहा गुन्हे नोंद असून आता पोलिस त्याच्या शोधात आहेत.