बिबटच्या पिल्लाचा शिकार करणाऱ्या तिघांना ३ वर्षांची सक्तमजुरी; कुरखेडा कोर्टाने दिली मोठी शिक्षा
कुरखेडा (गडचिरोली), २० एप्रिल २०२६: तालुक्यातील दादापूर राखीव वनक्षेत्रात २०१४ मध्ये बिबटच्या पिल्लाचा शिकार करून त्याची कातडी व नखे विक्रीसाठी नेणाऱ्या तिघांना न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, कुरखेडा यांनी आज दोषी ठरवले. न्यायाधीश एन.पी. देशपांडे यांनी आरोपींना वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत तीन वर्षांची सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली.
प्रकरण काय आहे?
१० ऑक्टोबर २०१४ रोजी नागपूर येथील गोंदवाना चौकात क्राईम ब्रांचचे एपीआय जी.डी. कुंभारे यांनी आरोपी मोरेश्वर चरणदास आंबाडे याच्या ताब्यात लेओपर्ड पिल्लाची कातडी व पाच नखे आढळल्याने जप्त केली. चौकशीत आरोपी नलिन काशिनाथ आंबाडे याने ही कातडी आरोपी नं. ३ परशराम झिटारू नरोटे याच्याकडून घेतल्याचे उघड झाले. परशराम नरोटे याने दादापूर वनक्षेत्रातील कंपार्टमेंट क्र. २४५ मध्ये कुत्र्यांवर हल्ला करणाऱ्या लेओपर्ड पिल्लाला कुऱ्हाडीने मारून त्याची कातडी काढली होती.
वन विभागाने या प्रकरणी वन अपराध क्र. ५२७/२०१४ नोंदवला. सहाय्यक वनसंरक्षक प्रितमसिंग कोडापे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयाने सर्व पुरावे, जप्त कातडी-नखे, कागदपत्रे, जागेची पंचनामे व CCMB चा अहवाल विचारात घेत आरोपींना दोषी ठरवले.
* आरोपी नं. ३ परशराम नरोटे – भारतीय वन कायद्याच्या कलम २६(१)(i) अंतर्गत ६ महिने सक्तमजुरी व ५०० रुपये दंड.
* सर्व तीन आरोपी – वन्यजीव (संरक्षण) कायद्याच्या कलम ५१ अंतर्गत ३६ महिने (तीन वर्षे) सक्तमजुरी व प्रत्येकी १०,००० रुपये दंड.
दंड न भरल्यास अतिरिक्त ४ महिने सक्तमजुरी. तिघांनी ११ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०१४ पर्यंत कोठडीत काढलेला कालावधी सेट-ऑफ मिळणार आहे. कातडी व नखे शासनाच्या ताब्यात देण्यात येणार असून, कुऱ्हाड व दुचाकी जप्त करण्याचे आदेश देण्यात आले.
सदर प्रकरणात सरकारच्या वतीने एड. अविनाश नाकाडे यांनी बाजू मांडली तर आरोपींच्या वतीने एड. गोकूल नागमोती यांनी युक्तिवाद केला.
वन विभागाने या निकालाचे स्वागत केले असून, वन्यजीव शिकारींना कठोर शिक्षा देण्याचा हा संदेश असल्याचे सांगितले. प्रकरण १० वर्षांपासून चालू होते.ही शिक्षा वन्यजीव संरक्षणासाठी एक महत्त्वाचा निकाल मानला जात आहे.
