उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नागेपल्लीतील लाडक्या बहिणींशी संवाद
1 min readगडचिरोली दि.६: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील नागेपल्ली या गावात महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये मिळाले का, याबाबत आस्थेने विचारपूस केली आणि सदर पैसे हे महिलांनी त्यांच्या स्वतःसाठी वापरण्याच्या सूचना दिल्या.
अर्ज कधी भरला, आधार कार्ड आहे का, बँक खाते काढले का, योजनेबाबत तक्रार आहे का आदी प्रश्न विचारून ज्या महिलांनी अद्याप पर्यंत अर्ज भरला नाही त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरण्याची आवाहन अजित पवार यांनी केले. तसेच ज्या महिलांना अद्यापही पैसे मिळाले नाही त्यांनी काळजी करू नये, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांना निश्चितच मिळेल याबाबत आश्वस्त केले. यावेळी एका मुकबधीर महिलेने आपल्या अडचणी मांडल्या असता उपमुख्यमंत्री पवार यांनी तातडीने तहसीलदार यांना बोलवून त्यांच्या अडचणी सोडवण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री यांना महिलांनी राखी बांधून त्यांचे स्वागत केले. अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यावेळी उपस्थित होते.