October 22, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

गडचिरोलीत ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमाला उत्‍स्फूर्त प्रतिसाद

  • तीन दिवसातच 70 टक्के नोंदणी
  • जिल्ह्यात 647 योजनादूत देणार विविध योजनांची माहित
  •  दरमहा 10 हजार रूपये मानधन
  •  13 सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

गडचिरोली , सप्टेंबर  10: शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. याअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात 647 ‘योजनादूत’ निवडण्यात येणार असून सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत 453 उमेदवारांनी (70 टक्के) योजनादूतसाठी नोंदणी केली आहे. या उपक्रमासाठी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर 7 सप्टेंबर 2024 पासून नोंदणी सुरु झाली असून 13 सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत देण्यात आली आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक उमेदवारांनी यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण 50 हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा 10 हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. गडचिरोली जिल्ह्यात एकूण 647 योजनादूतांची निवड करण्यात येणार आहे.

*असे आहेत निवडीचे निकष*
या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

*आवश्यक कागदपत्रे*
मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवीपरिक्षा उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे, सक्षम यंत्रणेने दिलेला अधिवासाचा दाखला, आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) सादर करणे आवश्यक आहे.
नोंदणीप्रक्रीया पूर्णत: ऑनलाईन असून उमेदवारांना 13 सप्टेंबर 2024 पर्यंत www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!