कुरखेड्यात १४ साज्यांवर पूर्णवेळ तलाठीच नाही, अनेक तलाठ्यांकडे दोन साजाची जबाबदारी; शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना माराव्या लागतात चकरा
1 min readकुरखेडा, २४ सप्टेंबर: शासकीय यंत्रणेच्या दृष्टीने महसूल विभाग अतिशय महत्वाचा समजला जाते. कोणत्याही शासकीय कामकाजासाठी महसूल विभागाशी संपर्क साधल्याशिवाय पर्याय राहत नाही. मात्र, स्थानिक पातळीवर सेवा देणाऱ्या महसूल विभागातील तलाठ्यांचे पदच रिक्त असल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. एका कुरखेडा तालुक्यात २६ साजासाठी १२ तलाठी सेवा देत आहेत. यामुळे येथील नागरिकांना अनेकदा चकरा माराव्या लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कुरखेडा तालुक्यात १२४ गावे असून ८६ हजार लोकसंख्या आहेत. शासनाने प्रशासकीय कामकाज सुरळीत चालावे, यासाठी महसुलीदृष्ट्या २६ साजे तयार केले आहे. या साजाच्या माध्यमातून सर्व गावातील नागरिकांना प्रशासकीय सेवा उपलब्ध करून देता येईल,यादृष्टीने प्रयत्न चालविले जात आहे. असे असले तरी तयार असलेल्या साजांपैकी केवळ ४६ टक्के साजांवरच तलाठ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर उर्वरीत साजाचा प्रभार अतिरिक्त देण्यात आला आहे. यामुळे तालुक्यात सेवा देणाऱ्या तलाठ्यांची चांगलीच दमछाक होत असल्याची ओरड आहे. मात्र, शासनाची सेवा द्यायची असल्यामुळे कर्मचारी काम करीत असले तरी एका साजावर गेल्यानंतर दुसऱ्या साजातील नागरिकांना तलाठी भेटत नसल्याची ओरड आहे. एकुणच तलाठ्यांना नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे.
शेतीसाठी संवेदनशील असलेल्या या तालुक्यात तलाठ्यांचे पद रिक्त असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरवर्षी कधी कोरडा तर कधी ओल्या दृष्काळाचा सामना येथील शेतकऱ्यांना करावा लागते. वेळेत पंचनामे करणे अपेक्षित आहेत. मात्र, तालुक्यातील अनेक साजांचा अतिरिक्त प्रभार असल्यामुळे वेळेत पंचनामे केले जात नाही. परिणामी, येथील शेतकऱ्यांना शासनाच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागत असल्याचीही ओरड आहे.
कुरखेडा तालुक्यात एक ते दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावांची संख्या २५ आहे. तर त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांची संख्या ३ आहे. हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेली गावे ३४ आहेत. या सर्व गावातील नागरिकांना सुरळीत सेवा देण्याची जबाबदारी तलाठ्यांची आहे. येथील तलाठी सुरळीत सेवा देण्याचा प्रयत्न करीत असले तरी अतिरिक्त प्रभारामुळे सर्वच नागरिकांचा समाधान करणे कठीण जात आहे. यामुळे अनेकदा नागरिकांच्या रोषाला तलाठ्यांना बळी पडावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने कुरखेडा तालुक्यातील तलाठ्यांचे रिक्तपद त्वरीत भरावे, अशी मागणी होत आहे.