75 लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या माओवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश
1 min readगडचिरोली, सप्टेंबर २४ : 70 हून अधिक गुन्हे करुन सतत जवानांना चकवा देणाऱ्या माओवाद्याला ठार करण्यात अखेर सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवार जवानांनी मोठी कारवाई केली. या कारवाई दरम्यान 75 लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या माओवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे.
महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर सोमवारी झालेल्या चकमकीत गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय असलेला तीन राज्यात मिळून 75 लाख रुपये बक्षीस असलेला जहाल माओवाद्याला ठार करण्यात आलं. या माओवाद्याची ओळख पटली असून त्याचं नाव रुपेश मडावी आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून सहा किलोमीटर अंतरावर अबूझमाडच्या जंगलात छत्तीसगडच्या सुरक्षा दलांसोबत काल झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार झाले होते.
यातील पुरुष माओवाद्याची ओळख पटली असून गेली वीस वर्ष गडचिरोली जिल्ह्याच्या माओवादी संघटनेत सक्रीय भूमिकेत असलेला रुपेश मडावी याचा त्यात समावेश असून माओवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य आणि कंपनी क्रमांक दहाचा कमांडर आहे. त्याच्यावर 70 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून पोलीस उपनिरीक्षक वनमाने यांच्यासह काही पोलीस जवानांच्या हत्येचा तो गुन्हेगार आहे.