December 22, 2024

अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

1 min read
  • नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान
  • आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त

नागपूर,१८ डिसेंबर : माध्यमात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तिला अधिक माहिती सक्षम होण्याचा मार्ग कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच ‘एआय’ ने उपलब्ध करून दिला आहे. आपल्या मातृभाषेतून मिळणा-या ज्ञानाला ज्या मर्यादा होत्या, त्या मर्यादा आता ‘एआय’ च्या माध्यमातून कमी झाल्या आहेत. ज्या भाषेत आपल्याला माहिती हवी आहे, त्या भाषेत ती सहजरित्या उपलब्ध होते. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेपासून दूर राहण्याऐवजी तंत्रज्ञान समजून घेणे आणि आपल्या वापरातून ते अधिक परिपूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले.
नागपूर प्रेस क्लब आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक नागपूर कार्यालयाच्या वतीने ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स इन जर्नालिझम’ (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता) या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
ज्येष्ठ पत्रकार तथा माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर – अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे, माहिती संचालक किशोर गांगुर्डे, दयानंद कांबळे उपस्थित होते.
श्री. ब्रिजेश सिंह म्हणाले, कोणतेही नवीन तंत्रज्ञान आले की नोक-या कमी होतील, अशी एक भीती व्यक्त होत असते. मात्र तंत्रज्ञानातून नवनवीन संधी निर्माण झाल्याची प्रचिती आपण आजवर घेत आलो आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीतही अशीच भीती व्यक्त केली जात आहे. वास्तविक याचा परिपूर्ण वापर जर करता आला नाही, तर संबंधितांना आपल्या नोक-या गमाविण्याची भीती अधिक आहे. हे माध्यम वापरतांना मात्र प्रत्येकाला अगोदर स्वत:ला सिध्द करावे लागेल. एआयच्या माध्यमातून जी काही माहिती आपल्यासमोर येईल, त्या माहितीला अधिक पडताळून घेणे, त्यात असलेल्या त्रृट्या दुरूस्त करून अधिक परिपूर्ण करणे, अशा माहितीला नैतिक व संवैधानिक दृष्टीने पडताळून पाहणे व दक्ष राहून चुका दुरुस्त करणे, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलतांना दिला.
आज विविध समाजमाध्यमांचा लोकांवर प्रचंड प्रभाव आहे. यात अनेक धोके आहेत. एखादी व्यक्ती गाफील राहून आपल्या मोबाईलवर आलेल्या चुकीच्या संदेशाला बळी पडला तर त्याला आर्थिक फसवणुकीलाही तोंड द्यावे लागते, याची अनेक उदाहरणे आहेत. यातील भीती बाजुला सारून आपण दक्ष असायला हवे. इतर प्राणीमात्रांबद्दल व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून ज्या मानवतेच्या दृष्टीने आपण त्यांना पाहतो, त्याच दृष्टीमध्ये संवैधानिक व सत्य -असत्य या परिभाषेत सावध होत ‘एआय’ ला आपण जवळ केले पाहिजे. कोणतीही उत्सुकता ही ज्ञानाच्या स्त्रोतांपर्यंत आपल्याला घेऊन जात असते. पुर्वी या उत्सुकतेला आपण गुगलची जोड देऊन समाधान करून घेतले. आता या उत्सुकतेचे अधिक पुढचे पाऊल म्हणून एआय मार्फत मिळणा-या माहितीकडे पाहावे लागेल, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे म्हणाले, आपल्यामध्ये मुळात असलेल्या गुणवत्तेसोबतच कृत्रीम बुध्दीमत्तेचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. भारत विरोधी कृत्य करण्यासाठी एआय चा वापर होणार नाही, यासाठी एआय ची माहिती भारतीय पध्दतीने तयार करणे आवश्यक आहे. मराठी भाषेलासुध्दा एआय शी जोडावे लागणार आहे. तसेच अशा कार्यशाळांचे अधिकाधिक आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही राहुल पांडे यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी केले. संचालन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक डॉ. गणेश मुळे यांनी तर आभार माहिती संचालक दयानंद कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार बाळ कुलकर्णी, धमेंद्र झोरे, भुपेंद्र गणवीर यांच्यासह विविध माध्यमातील पत्रकार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच राज्यातील जिल्हा माहिती कार्यालये आणि विविध पत्रकारिता संस्थांनी ऑनलाईन पध्दतीने व्याख्यानाचा लाभ घेतला.

About The Author

error: Content is protected !!