भामरागड मधील शेतकऱ्यांना मिळाले आधुनिक शेतीचे धडे
1 min readगडचिरोली, ९ जानेवारी : महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ पुणे, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, कृषी विभाग गडचिरोली व कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय निवासी “शेडनेट हाऊस व लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण” कार्यक्रमाचे उद्घाटन प्रज्ञा गोळभाटे, स्मार्ट विभागीय नोडल अधिकारी,नागपूर विभाग, प्रीती हिरळकर ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,गडचिरोली, हेमंत जगताप,वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी,महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ,पुणे, किशोर बागडे,तहसीलदार, भामरागड, डॉ. किशोर झाडे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र,सोनापूर,गडचिरोली, अर्चना कोचर, स्मार्ट नागपूर, कुणाल राऊत,तालुका कृषी अधिकारी,भामरागड इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत आज तहसील कार्यालय भामरागड जिल्हा गडचिरोली येथे पार पडले.
सुरुवातीला हेमंत जगताप वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे यांनी आपल्या प्रास्ताविकात राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत प्रथमच अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम भामरागड येथे आयोजित करण्यात येत असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी श्रीमती हिरळकर यांनी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत विविध विषयांचे प्रशिक्षण दरवर्षी आयोजित केली जातात व यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुणे किंवा इतर भागांमध्ये जावे लागते, परंतु प्रथमच भामरागड या भागामध्ये अशा प्रकारचे प्रशिक्षण घेतल्यामुळे येथील शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीचे तंत्रज्ञान व त्यामधील भाजीपाला लागवड याविषयी शास्त्रीय पद्धतीने तज्ञ व्यक्तींकडून मिळणाऱ्या माहितीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. किशोर बागडे तहसीलदार भामरागड यांनी अशा प्रकारे प्रशिक्षण महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाने भामरागड येथे घेतल्याबद्दल आभार मानले व जास्तीत जास्त अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात यावे असे सूचित केले. श्रीमती गोळघाटे यांनी यापुढे शेतकऱ्याने पिकांमध्ये बदल करणे आवश्यक असून, शेतीमध्ये नवीन प्रयोग करणे गरजेचे असल्याचे सांगितले व त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत शासनाकडून करण्यात येईल असे सूचित केले. डॉक्टर किशोर झाडे यांनी भामरागड मधील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या सोयी सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. आनंद गंजेवार,उपविभागीय कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना भविष्यामध्ये येथील शेतीतील मालाला मार्केटिंग मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत जगताप यांनी तर आभार प्रदर्शन कुणाल राऊत यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्याकरता कृषी विभाग भामरागडचे सहकार्य लाभले.