अपघात प्रवण स्थळ निश्चितीसाठी संयुक्त तपासणी मोहीम राबवा, जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या आढाव्यात जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या सूचना
1 min readगडचिरोली , १० जानेवारी : जिल्ह्यातील अपघात प्रवण स्थळांची ओळख निश्चित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग, उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस विभाग आदी सर्व यंत्रणांनी संयुक्त तपासणी मोहीम राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज दिल्या.
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचा आढावा जिल्हाधिकारी पंडा यांनी आज घेतला, याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला सहायक जिल्हाधिकारी राहुल मीना, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक जाधव, सहायक अधीक्षक अभियंता सुमीत मुंदडा, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक शरद मेश्राम, तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी राष्ट्रीय महामार्गावर अपघात टाळण्यासाठी आवश्यकतेनुसार स्पीड ब्रेकर लावणे, रस्त्यावर दिशादर्शक फलक लावणे, वाहतुकीत अडथळे ठरणारे रस्त्यावरील अतिक्रमण काढून टाकण्याच्या सूचना दिल्या. यासोबतच जिल्ह्याच्या सीमेवर ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवण्याचे सांगितले.
बैठकीत गडचिरोली ते आरमोरी मार्गाच्या दुरुस्तीच्या अडचणींबद्दल चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी पंडा यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नियोजन करण्याचे निर्देश दिले. बैठकीला संबोधित अधिकारी उपस्थित होते.