आरोग्य विषयक कार्यक्रम अंमलबजावणी निर्देशांकामध्ये गडचिरोली जिल्हा राज्यात तिसरा
1 min readगडचिरोली , १२ जानेवारी : महाराष्ट्र राज्यात गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम जिल्हा म्हणुन ओळखला जातो. विखुरलेली व डोंगराळ जंगलव्याप्त गावातील नागरीकांना आरोग्य सेवेचा लाभ वेळेवर मिळावा याकरिता आरोग्य विभाग सतत प्रयत्नशील असतो.
नुकतेच आरोग्य कार्यक्रमांचे अंमलबजावणी नोहेंबर २०२४ चे रँकिंग संचालक आरोग्य सेवा, आयुक्त कार्यालय मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातील निर्देशकांवर आधारित रँकिंग राज्यस्तरावर तयार करण्यात येते. मागील सहा महिन्यापासून जिल्हा आरोग्य विभाग राज्यात पहिल्या पाच मध्ये राहिलेले आहेत . यामध्ये विविध आरोग्य योजनांचा समावेश असतो आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा निर्देशांक उदा. गरोदरपणात दिल्या जाणाऱ्या सेवा, लसीकरण, इत्यादी मोजले जातात.
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व आरोग्य विषयक कार्यक्रम जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येतात. यात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, गरोदर माता नोंदणी, माता व बाल संगोपन, बालकांचे लसीकरण, राष्ट्रीय असंसर्गजन्य नियंत्रण कार्यक्रम साथरोग, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम, किशोरवयीन मुला-मुलींचे आरोग्य, हिवताप निर्मुलन कार्यक्रम, सुरक्षीत व संस्थेत प्रसुती अश्या विविध ६४ आरोग्य निर्देशाकामध्ये केलेल्या कामाच्या आधारावर आयुक्त कार्यालयाकडुन गुणांकण केलेल आहे.
दुर्गम ,अतिदुर्गम भागात आरोग्य सेवा देत असतांना अनेक अडीअडचीनांना तोंड दयावे लागते.अशा परिस्थीतीमध्ये जिल्ह्यातील विविध आरोग्य कार्यक्रम समन्वयक, जिल्हा स्तरीय पर्यवेक्षकीय अधिकारी, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका यांच्या प्रयत्नाने हे शक्य झाले असल्याचे व यानंतर देखील राज्यात कायम अव्वल राहण्याकरिता आरोग्य विभाग प्रयत्नशिल राहणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी सांगितले. याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह आणि राजेंद्र भुयार (प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी) यांनी सर्वाचे अभिनंदन केले आहे.