मुनघाटे महाविद्यालयाचा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा व्हॉलीबॉल संघ विद्यापीठ स्पर्धेत प्रथम
1 min readकुरखेडा, १३ जानेवारी : दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री. गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाचा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा व्हॉलीबॉल संघ हा गोंडवाना विद्यापीठाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या अमृत क्रीडा व कला महोत्सवातील व्हॉलीबॉल स्पर्धेत विजेते पद पटकावित दुसऱ्यांदा चॅम्पियनशिपचा मानकरी ठरला आहे.
गोंडवाना विद्यापीठाद्वारा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकरीता क्रीडा व कला स्पर्धांचे विद्यापीठ परिसरात आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाविद्यालयाचे मुख्य लिपिक श्री . मधुकराव बोबाटे यांच्या नेतृत्वात महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा व्हॉलीबॉल संघ सहभागी झाला होता.
उद्घाटनीय सामन्यात जनता महाविद्यालय चंद्रपूरचा २-० असा तर पुढील सामन्यात गडचांदुर महाविद्यालयाचा सुद्धा २-० असा सरळ सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
अंतिम सामन्यात महाविद्यालयाच्या संघाने गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या संघाचा २-० असा सरळ सेटमध्ये पराभव करून पुन्हा एकदा चॅम्पियनशिप पटकावित महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली.
विशेष म्हणजे या संपूर्ण स्पर्धेत महाविद्यालयाच्या संघाने एकही सेट न गमविता हे विजेतेपद पटकाविले आहे. या स्पर्धेत अतिशय महत्वपूर्ण योगदान देत संघाला विजयश्री मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार संघाचे श्री. रत्नाकरजी वासेकर यांना देऊन गौरविण्यात आले.
महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक श्री. मधुकराव बोभाटे यांच्या नेतृत्वात श्री . रत्नाकर वासेकर, श्री . मंगेश मुनघाटे, श्री. सतीश मुनघाटे, श्री. कैलास जांभूळकर, श्री. आशिष बगमारे, श्री . सुभाष चिकराम, श्री . राजेंद्र काचीनवार, इत्यादींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. महाविद्यालयीन संघाच्या जडणघडणीत प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांचे मौलिक मार्गदर्शन व प्रेरणा आणि शारीरिक शिक्षण विभागाचे प्रभारी प्रमुख प्रा. डॉ. दशरथ आदे यांचे कुशल मार्गदर्शन मिळाले. तसेच प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, श्री. सुरेश मंगर यांचे सहकार्य लाभले.
वरील विजेतेपदाचा पुरस्कार हा बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांचे अध्यक्षतेखाली विशेष अतिथी आंतरराष्ट्रीय धावपटू व नागपूर विद्यापीठ शारीरिक शिक्षण विभागाचे माजी संचालक प्रा. डॉ . शरद सुर्यवंशी यांचे हस्ते प्रमुख अतिथी प्रा. डॉ. राजकुमार मुसने, महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे आणि चंद्रपूर-गडचिरोली शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष , सचिव यांचे उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
विजेत्या संघाचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, उपप्राचार्य पी. एस. खोपे, उपप्राचार्य डॉ. अभय साळुंके, डॉ. दशरथ आदे तसेच सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी यांनी केलेले आहे.