कुरखेड्याच्या सती नदीत युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ: घातपाताचा संशय

गडचिरोली, २५ जानेवारी: कुरखेडा येथील सती नदी पात्रात कुंभीटोला मार्गावर नगरपंचायतच्या इन्वेल जवळ २१ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. मृतकाची ओळख कुरखेडा तालुक्यातील गोठणगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या उपरिकर टोली येथील रोहित राजेंद्र तुलावी वय २१ वर्ष अशी झाली असून तो बीए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता.
प्राप्त माहितीनुसार आज सकाळी फिरायला जाणाऱ्या लोकांना नदीपात्रात एक युवक इनव्हेल जवळ पडून असल्याचे लक्ष्यात आले. जवळ जावून बघितले असता त्याची कुठलीच हालचाल दिसून आली नाही. सदर घटनेची माहिती येथील पोलिस विभागाला देण्यात आली. पोलिसांनी युवकाला येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले. कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी युवकाची तपासणी करून मृत घोषित केले. घटनेची माहिती कळताच परिसरातील लोकांनी उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली.