कुरखेड्यात रेती तस्करी रोखण्यासाठी “चेकपोस्ट” , महसूल व पोलिस कर्मचारी तैनात

गडचिरोली न्यूज नेटवर्क,गडचिरोली , १६ फेब्रुवारी : गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने आता सक्त पाऊल उचललेआहे. मुख्य मार्गावर चेकपोस्ट निर्माण केले जाणार आहेत. या ठिकाणी रात्रंदिवस महसूल व पोलिस कर्मचारी तैनात राहणार आहेत. याबाबतचे पत्र कुरखेडाचे उपविभागीय अधिकारी रणजित यादव यांनी निर्गमित केले आहे.
आंधळी, चिखली, चिचटोला, वाकडी, कुरखेडा कुंभीटोला मार्गे होणाऱ्या गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीला नियंत्रित करण्यासाठीनान्ही- कुंभीटोला फाटा , चिखली-आंधळी फाटा, कुरखेडा- वाकडी फाटा येथे तीन चेकपोस्ट बसविले आहे.
या ठिकाणी रात्रंदिवस महसूल विभाग व पोलिस विभागाचे कर्मचारी तैनात राहणार आहेत. सात दिवसांसाठी तीन पथक तयारकरण्यात आले आहेत. या ठिकाणी प्रत्येकी आठ तास याप्रमाणे दिवसातून तीन पथकांचे कर्मचारी तैनात राहणार आहेत. पथकांचीनेमणूक केल्यामुळे गौण खनिज चोरीला आळा बसेल, अशी अपेक्षा महसूल विभागाला आहे. पथकांची तस्करांनी धास्ती घेतलीआहे. पोलिस पाटलांनाही चेकपोस्टवर नियुक्तीचे निर्देश देण्यात आले आहेत.
अंतर्गत रस्त्यांचे काय?
कुरखेडा शहरात काही रस्ते आतमधून येतात. जसे कुंभीटोला मार्ग, चिलघर मार्ग, तळेगाव मार्ग, डिप्रा टोला मार्ग, मालदुगी मार्ग, जंभूरखेडा मार्ग या रस्त्यांवरून होणारी रेती तस्करी कशी रोखणार, असा प्रश्न आहेच. सध्या मोठ्या प्रमाणात बैलांनी या मार्गावरून रेती तस्करी सुरू आहे.
महसूल व पोलिस खात्यात रिक्त पदांमुळे पहिलेच कामाचा ताण आहे. कित्येक महसूल साजे प्रभारी तलाठ्यांकडे असल्याने कामाचा भार अधिक आहे. महसूल तपासणी नाके क्रियान्वित केल्याने आता महसूल व पोलिस यंत्रणेवरील कामाचा भार अधिकच वाढलाआहे. त्यातच दरदिवशी कर्मचारी तैनात ठेवावे लागणार आहेत. चेकपोस्टवर कर्तव्य कधी बजावायचे व आपल्या सज्जाचे काम कधीकरायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.