सती नदी पात्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित: वाळू तस्करी रोखण्यासाठी तहसीलदारांनी केले प्रवेश मार्ग बंद

“बंद केलेले प्रवेश मार्ग प्रभावित केल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार”
कुरखेडा; १२ मार्च : येथील सती नदी पात्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले असून वाळू तस्करी रोखण्यासाठी तहसीलदार रमेश कुंभरे यांनी नरळदीपत्रातील संभव्य प्रवेश मार्ग अवरुद्ध करून बंद केले आहे. बंद केलेले सदर मार्ग बाधित करून सती नदी पात्रात प्रवेश करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना सर्व महसूल कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
कुरखेडा मुख्यालयात महसूल तपास नाके स्थापन केल्या नंतर ही मोठ्याप्रमाणात अवैध वाळू उपसा करून पुरवठा केला जात होता. सदर गंभीर बाबींचा माध्यमांद्वारे बातम्या प्रकाशित करून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या जात होत्या. २४ तास पहारा असताना ही होणारी वाळू तस्करी येथील महसूल प्रशासनासाठी आवाहन ठरत असल्याने आज साती नदी पात्र प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून नायब तहसीलदार राजकुमार धनबाते यांच्या नेतृत्वात मंडळ अधिकारी नवले, कुरखेडा तलाठी ठाकरे, कोतवाल मयूर उईके यांनी तहसीलदार कुरखेडा यांच्या सूचने वरून सती नदी पात्रात प्रवेश करण्यासाठी तस्करांनी तयार केलेल्या पोच मार्गात जेसीबी द्वारे खड्डे खोदून मार्ग अवरुद्ध केले आहे. कुरखेडा मुख्यालय लगतच्या कुंभिटोला, कुरखेडा चिलघर , चिचटोला, आंधळी, मालदुगी , जंभुरखेडा वाकडी, येथील पत्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपश्यावर विशेष निगराणी करण्याचे सूचना महसूल पथकास देण्यात आल्या आहेत.
महसूल विभागातील काही जयचंद वाळू तस्करांना गस्ती पथकाची माहिती पुरवून चिरी मिरी करीत असल्याची तक्रारी तहसीलदारांना प्राप्त झाल्या असून या जयचंदांना तोंडी ताकीद करून सदर प्रकार बंद करून प्रशासनाशी प्रामाणिक राहण्यासाठी ठणकावण्यात आले आहे.