देवाचा दावा; चौक्या, गस्ती पथक त्याला रेती तस्करी करण्यापासून रोखू शकत नाही

“दोन दशकांपासून अवैध रेती व लाल माती विटांच्या तस्करीच्या कामात असलेल्या या ” देवा ” नामक रेती तस्करावर आजपर्यंत कार्यवाही झालेली नाही, आपण पूर्ण प्रशासन मॅनेज करूनच काम करत असतो अशी बतावणी उघडपणे करत असून प्रशासन माझ्या गाड्या पकडूच शकत नसल्याचे बोलत असल्याची परिसरात जोरदार चर्चा आहे.”
कुरखेडा, 20 मार्च : महाराष्ट्रात राज्याचे मुख्यमंत्री “देवा भाऊ” सर्वांना परिचित आहेत. राज्याला प्रगतीशील करण्यासोबतच गडचिरोली जिल्ह्याची प्रगतीकडे वाटचाल सुनिश्चित करण्यासाठी कुठलीही कसर त्यांनी सोडलेली नाही. पण सध्या कुरखेड्यात ज्या “देवा” उर्फ रेती तस्करीच्या “पुष्पा”ची जोरदार चर्चा आहे. कोट्यावधी रुपयाचे महसूल बुडवून मोठ्याप्रमाणात कमाई करीत आहे. मागील दोन दशकांपासून अवैध रेती, लाल विटांच्या माध्यमाने कुरखेडा तालुक्यात आपला साम्राज्य निर्माण केला असून आपल्या तस्करी कामासाठी आपण अख्खा सिस्टमच मॅनेज करतो अशी बतावणी करून सध्या करत असल्याची परिसरात चर्चा आहे.
या चर्चेवर विश्वास बसावा अशीच काही परिस्थिती कुरखेडा तालुक्यात आहे. जिल्हाधिकारी अविष्यांत पांडा यांनी जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उपश्यावर आळा बसावा व शासनाचे महसूल बुडूनये या उद्देशाने पोलिस, महसूल, वन विभागाच्या समन्वयाने संभावित वाहतुकीच्या ठिकाणी तपासणी नाके स्थापन करून २४ तास पाहरा ठेवण्याचे निर्देश दिल्यानुसार येथील सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रणजीत यादव यांनी आदेशीत करून महसूल तपासणी नाके उभारले खरे पण तालुक्यातील अवैध रेती तस्करी मात्र पूर्वीपेक्षा अधिक जोमाने होवू लागल्याने “देव”च्या दाव्यांवर लोकांना विश्वास बसू लागला आहे.
महसूल विभागाने कुंभीटोला नदी पात्राजवळ नवीन तपासणी नाका उभा केला आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा “देवा” त्या चौकीच्या उभारणी प्रसंगी तेथे उपस्थित होता व चौकी उभारणीने माझ्या कामात तिळमात्र फरक पडणार नाही, नवीन ठिकाणावरून रेती काढू, तुम्ही कुठे कुठे चौक्या उभाराल असा मगरूरीने बोलून गस्ती पथक ही मला रेती तस्करी करण्यापासून रोखूच शकत नाही माझ्या गाड्या पकडू शकत नाही असा दावा करत होता. येथील एका वरिष्ठ अधिकाऱ्यास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत , तोच एकच मॅनेज होत नाही आहे, बाकी सर्व यंत्रणा खिशात असल्याचा दावा तो करत होता अशी माहिती आहे. या पूर्वीही या “देवा” नामक रेती तस्करावर येथील पत्रकारांनीबातम्या छापल्या म्हणून या देवाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. त्या ठिकाणी उपस्थित एका पत्रकाराच्या भावाने त्याची ध्वनिफीत पुरावा म्हणून तयार केली होती. शिवीगाळ प्रकरणी पुरावा मिळून असल्याने त्यावर कुरखेडा पोलिस मधे अश्लील शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गाव मंडई दरम्यान या “देवा” ने त्याच्या घरी बकरा पार्टी ठेवली होती. या जेवणाच्या पंक्तीत येथील काही बड्या अधिकाऱ्यांची उपस्थिती पाहूनही लोकांना “देवा” च्या व्यवस्थेवर नियंत्रण असल्याच्या दाव्यांवर विश्वास करण्यास भाग पाडले आहे.
रेती तस्करी व लाल माती विटांच्या कामात दोन दशकांपासून सक्रिय असल्याने अख्ख्या तालुक्यात हा “देवा” सुपरिचित आहे. बांधकाम करणाऱ्यांना हमखास रेती, विटा पोहोचता करण्यात त्याला महारात असल्याचे बोलले जाते. याच कारणाने त्याच्याकडे मोठ्याप्रमाणत रेती विटांची मागणी येत असते. त्याला असलेले ऑर्डर नियोजन पद्धतीने आपल्या इतर साथीदारांना वाटणी करून घेत आपला हिस्सा त्यातून मिळवत असतो. शिक्षणात मागे राहिल्याने लिहिता वाचता न येणाऱ्या या “देवा”ने मात्र रेती उपश्यात पीएचडी केली असल्याचे बोलले जाते. “जिसकी हवा, उसका साथ” म्हणत आपला कारोबार अविरत सुरू ठेवण्याची विशेष कला या “देवा” कडे असल्याचे बोलले जाते. या देवाची मगरुरी प्रशासन कधी उतरावेल असा प्रश्न जनमाणसातून विचारलं जावू लागला आहे.