महागाव येथे जागतिक क्षयरोग दीन साजरा

महागाव (अहेरी) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महागावचे माजी सरपंच विनोद वेलादी होते, तर ग्राम पंचायत सदस्य राजेश दुर्गे आणि महागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. लुबना हकीम, आरोग्य सहायिका शीतल डोंगरे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.
डॉ. लुबना हकीम यांनी क्षयरोगाच्या लक्षणे, प्रसार मार्ग आणि उपचार पद्धती याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जिवाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. त्याची लक्षणे म्हणजे दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, संध्याकाळी ताप येणे, रात्री घाम येणे इत्यादी आहेत. उपचार न केल्यास हा रोग इतरांना पसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे उपचार घेणे आवश्यक आहे.
कार्यक्रमात क्षयरोगावर यशस्वीपणे मात केलेल्या रुग्णांचा सत्कार करण्यात आला. सत्कारित रुग्णांमध्ये जनाबाई अलोने, कोंडाया हिरवकर, वसंत तोरण, संतोष आलम, पापाया आत्राम, पार्वती आत्राम आणि मंगेश पेंदाम यांचा समावेश आहे. त्यांच्या अनुभवांनी इतरांना आशा आणि प्रेरणा दिली.
या कार्यक्रमाला श्रीमती घोगे आरोग्य साहायीका व श्रीमती शीतल डोगरे आरोग्य साहायीका व गावातील प्रतिष्ठित नागरिक, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर आणि इतरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या उपक्रमामुळे गावात क्षयरोगाविषयी जागरूकता वाढली असून, रुग्णांना योग्य उपचार मिळविण्यास मदत झाली आहे.