April 26, 2025

कमी गुंतवणुकीत अधिक नफा देणाऱ्या मधमाशीपालन व्यवसायाकडे वळा, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे युवा शेतकऱ्यांना आवाहन

गडचिरोली, २६ मार्च २०२५ – मधमाशी पालन हा कमी गुंतवणुकीत अधिक नफा देणारा, पर्यावरणपूरक आणि शाश्वत व्यवसाय असून जिल्ह्यातील तरुणांनी व शेतकऱ्यांनी स्वावलंबनासाठी व आर्थिक उन्नतीसाठी या व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर – गडचिरोली येथे “शास्त्रोक्त मधमाशीपालन प्रशिक्षण” या सात दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप २६ मार्च २०२५ रोजी करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन कृषी विभाग, गडचिरोली, महाराष्ट्र शासन व राष्ट्रीय मधमाशी मंडळ, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने २० ते २६ मार्च २०२५ दरम्यान करण्यात आले होते.
या समारोप कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. पंडा यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना मधाचे उत्पादन, मेण, राजान्न (रॉयल जेली), पोलन, प्रोपोलिस यांसारख्या आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या उत्पादनांमधून उत्पन्नाचे विविध स्रोत उपलब्ध होत असल्याचे सांगितले. तसेच मधमाशांमुळे होणाऱ्या परागीकरणामुळे शेतीतील फळे, फुले व भाजीपाला उत्पादनात सव्वा ते दीडपट वाढ होत असल्याचेही सांगितले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती प्रिती हिरळकर यांनी मधमाशी पालनातून शेतकऱ्यांचे आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होत असून हा व्यवसाय शेतीपूरक असल्याचे सांगितले.
डॉ. किशोर कि. झाडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. त्यांनी प्रशिक्षणाचा आढावा सादर करताना या सात दिवसांत प्रशिक्षणार्थींना सैद्धांतिक व प्रात्यक्षिक पद्धतीने मधमाशीपालनाचे सखोल प्रशिक्षण देण्यात आल्याचे सांगितले.
प्रशिक्षणादरम्यान तज्ञ मार्गदर्शक व मध व्यवसायिकांकडून मध, मेण, पोलन, राजान्न उत्पादनाचे विविध पैलू, बाजारपेठेतील मागणी, व्यवसायातील संधी याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमास श्री. पुष्पक ए. बोथीकर (पिक संरक्षण), डॉ. विक्रम एस. कदम (पशु संवर्धन व दुग्ध शास्त्र), श्री. सूचित के. लाकडे (उद्यानविद्या), डॉ. प्रितम एन. चिरडे (कृषीविद्या), श्री. नरेश बुद्धेवर (कृषी हवामान शास्त्र) हे विषय विशेषज्ञ तसेच अनेक शेतकरी बंधू-भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. सूचित के. लाकडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!