April 26, 2025

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून आपत्ती व्यवस्थापन जनजागृतीसाठी विशेष प्रशिक्षण

“प्रशिक्षणातून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम व्हावी- जिल्हाधिकारी”

गडचिरोली, दि. २ एप्रिल २०२५: राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), नागपूर यांचे पथकाद्वारे गडचिरोली जिल्ह्यात १ एप्रिल ते ११ एप्रिल २०२५ या कालावधीत आपत्ती व्यवस्थापन जनजागृती तसेच प्रात्यक्षिक आणि सराव कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून दि. २ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे, NDRF चे पोलीस निरीक्षक ब्रिजेशकुमार यादव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सहाय्यक प्रियंका ताजने यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
सदर प्रशिक्षण उपक्रमातून जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची तयारी अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने व आपत्ती काळात प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक ती माहिती, कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी प्रशिक्षणार्थी पथकाला केले.

आज झालेल्या प्रशिक्षण सत्रात NDRF पथकाद्वारे विविध विषयांवर सखोल माहिती व प्रात्यक्षिके देण्यात आली. यामध्ये DRR (Disaster Risk Reduction) संकल्पना, आपत्ती व आपत्कालीन परिस्थिती, आपत्तीचे प्रकार (भूकंप, भूस्खलन, पूर, त्सुनामी, चक्रीवादळ, विज पडणे, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, शितलहरी), घटना प्रतिसाद प्रणाली, आपदा मित्रांची भूमिका, BLS (Basic Life Support), कृत्रिम श्वासोच्छवास, choking, आपत्कालीन लिफ्टिंग आणि हालचाल, फायर सेफ्टी, जैविक, रासायनिक व आण्विक आपत्ती, गर्दी व्यवस्थापन, स्ट्रेचर तयार करणे, पीपीई किटचे योग्य वापर, प्राथमिक उपचार अशा अनेक महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश होता.

प्रशिक्षणामध्ये कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी या तालुक्यांतील महसूल, पोलीस, आरोग्य व महावितरण विभागातील बचाव पथक तसेच स्थानिक आपदा मित्रांनी सहभाग घेतला. जिल्हा कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील सहायक महसूल अधिकारी स्वप्निल माटे, आपदा मित्र चंद्रशेखर मोलंगुरवार, कल्पक चौधरी, अजित नरोटे, मयूर किन्नाके यांचीही उपस्थिती होती.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!