कोरचीच्या वार्ड क्रमांक १३ मध्ये पाणी टंचाई तीव्र: नागरिकांचा कर न भरण्याचा निर्धार

कोरची, ८ एप्रिल : – गडचिरोली जिल्ह्यातील कोरची नगर पंचायतीच्या वार्ड क्रमांक १३ मध्ये पाणी टंचाईने उच्चांक गाठला असून, संतप्त नागरिकांनी प्रशासना विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. दहा वर्षांहून अधिक काळ नगर पंचायत कार्यरत असूनही पाणी, रस्ते आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप करत रहिवाशांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत पाणी समस्येचे निराकरण न झाल्यास २०२४-२५ या वर्षाचा गृहकर आणि इतर कर न भरण्याचा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वार्ड क्रमांक १३ मध्ये सार्वजनिक पाणीपुरवठा योजना किंवा घरगुती नळ जोडणीचा अभाव आहे. भूजल पातळी खोल जात असल्याने आणि पाण्याचा वाढता उपसा होत असल्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच विहिरी कोरड्या पडत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून निर्माण झालेली भीषण पाणी टंचाई रहिवाशांचे जीवन असह्य करत आहे. “नगर पंचायत असूनही आम्हाला मूलभूत सुविधांसाठी का झगडावे लागते?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या निवेदनाला श्रीमती अनिता के. करसी, कैलाश रामजी नूरुटी, प्रा. आर. एस. रोटके, एल. आर. जनबंधू, एस. एन. होळी, करन बरनू देवांगन, अशोक लखन कोरेटी, नंदकिशोर राजाराम वैरागडे, उमेश केवलराम मोहुर्ले, रवींद्र श्रीराम वलथरे, प्रल्हाद जनकराम देवांगन, अंजारी रामकली दुधकवर, ओ. डी. टेंभूरणे, उषा टेंभुरणे, आर. एफ. कोडपे, बसंत बलियार तांडेकर, प्रमेश्वर ज्ञानेश्वर गायकवाड, गोपाल सिंगार, एस. एम. गोटा, सुरेश नामदेव आदे, श्री चक्रलाल श्रावण मांडवे, नंदलाल सोरी, गणेश काटेंगे, शकिला पठाण, वहाब पठाण, शालिकराम कराडे, यशवंत कावळे, श्रीमती कुमुद आनंदराव दरवडे, फत्तेसाय मैसूराम होळी, छत्रपती नीलकंठ बांगर, प्रा. विनोद टी. चहारे, संजय श्रीहरी दोनाडकर, कपुरचंद उहिरवाडे, डॉ. शैलेन्द्र कृष्णकुमार बिसेन आणि नगर पंचायत सदस्य यांनी पाठिंबा दिला आहे.
निवेदनाची प्रत नगराध्यक्षा, उपाध्यक्ष आणि स्थानिक वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना पाठवण्यात आली असून, प्रशासनावर तातडीने कार्यवाहीचा दबाव वाढला आहे. पाणी टंचाईमुळे कोरचीच्या प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.