बोळधा गावातील प्रेमप्रकरणातील हत्या: वर्षभरानंतरही मारेकरी मोकाट, मृताच्या आईची न्यायासाठी धडपड

आरमोरी (गडचिरोली), ८ एप्रिल : गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील बोळधा गावात वर्ष भरापूर्वी घडलेल्या एका प्रेम प्रकरणातील हत्येचे गूढ अद्यापही अनुत्तरित आहे. २४ वर्षीय प्रशांत रामदास उरकुडे या युवकाची दोरीने गळा आवळून हत्या झाली, पण या क्रूर कृत्य मागील मारेकऱ्यांचा शोध पोलिसांना अद्याप लागलेला नाही. मृताच्या आईने, मुक्ताबाई उरकुडे यांनी, मारेकऱ्यांनी पैशाच्या जोरावर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. “या जगात फक्त पैसेवाल्यांनाच न्याय मिळतो का? माझ्या मुलाला कधीच न्याय मिळणार नाही का?” असे हृदयद्रावक आर्जव त्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले.
ही घटना १७ एप्रिल २०२४ रोजी रात्री घडली. गावात रामनवमीची मिरवणूक सुरू असताना प्रशांतला त्याच्या प्रेयसीने फोन करून गावाबाहेर भेटण्यास बोलावले होते. प्रशांत आणि त्या युवतीचे प्रेमसंबंध होते, पण तिच्या कुटुंबाला हे मान्य नव्हते. मुलीच्या काकांनी तिचे लग्न दुसऱ्या युवकाशी ठरवले होते आणि प्रशांतच्या कुटुंबाला “त्याला सांभाळा, नाहीतर मारून टाकू” अशी धमकीही दिली होती. प्रशांतची आई मुक्ताबाई यांनी त्याला घराबाहेर जाण्या पासून रोखण्याचा प्रयत्न केला, पण रात्री त्या झोपेत असताना तो बाहेर गेला आणि परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी, १८ एप्रिलला, त्याचा मृतदेह विजय मुखरूजी राऊत यांच्या शेतात आढळला. त्याच्या गळ्याला दोरीचे तीन वेढे होते आणि अंगावर शर्टही नव्हता, ज्यामुळे दोन–तीन जणांनी मिळून त्याची हत्या केल्याचे स्पष्ट झाले.
प्रशांतचे कुटुंब – आई मुक्ताबाई, मोठे वडील अमृत उरकुडे आणि काका सुभाष उरकुडे – यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मारेकऱ्यांनी पैशाच्या जोरावर पोलिसांवर दबाव आणून तपासाला खीळ घातली. “आम्ही गरीब आहोत, पण म्हणून माझ्या मुलाला न्याय मिळू नये का?” असे मुक्ताबाई यांनी विचारले. त्यांनी मुलीच्या काकांवर संशय व्यक्त केला असून, त्यांच्या सह प्रशांतच्या एका मित्राचाही या हत्येत हात असण्याची शक्यता वर्तवली आहे. कारण, प्रशांतच्या मृत्यू नंतर त्याच्या मोबाईल वरून त्याच्या मृतदेहाचे फोटो मुलीच्या नातेवाईकांना पाठवले गेले आणि नंतर तो मोबाईल बंद करण्यात आला. प्रशांतच्या मोबाईलचे स्क्रिन लॉक उघडण्याची माहिती फक्त त्याच्या त्या मित्रालाच होती, असे कुटुंबाचे म्हणणे आहे.
हत्येनंतर आरमोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला, पण लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत तपासाकडे दुर्लक्ष झाले. तत्कालीन तपास अधिकाऱ्यांची बदली झाल्याने प्रकरण गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) सुरज जगताप यांच्याकडे सोपवण्यात आले. घटना स्थळावरून जप्त केलेल्या साहित्याचा फॉरेन्सिक अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. “फॉरेन्सिक रिपोर्ट मिळाल्याशिवाय आणि ठोस पुराव्यांशिवाय कोणालाही ताब्यात घेता येणार नाही,” असे एसडीपीओ जगताप यांनी स्पष्ट केले. दरम्यान, प्रशांतचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असला तरी त्यातील काही कॉल हिस्ट्री गायब असल्याचा संशय कुटुंबाने व्यक्त केला आहे. “सीडीआर (कॉल डेटा रेकॉर्ड) काढून आरोपींपर्यंत पोहोचणे पोलिसांना अवघड नव्हते, पण त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही,” असे कुटुंबाचे म्हणणे आहे.
गेल्या वर्षभरापासून प्रशांतचे नातेवाईक दर महिन्याला पोलीस ठाणे आणि एसडीपीओ कार्यालयात जाऊन तपासाची माहिती घेत आहेत. अलीकडेच त्यांनी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांची भेट घेतली. नीलोत्पल यांनी या प्रकरणाचा छडा लावण्याचे आश्वासन दिले आहे. “आम्हाला फक्त आश्वासने नकोत, आता कारवाई हवी,” अशी मागणी प्रशांतच्या काकांनी केली.
या घटनेने बोळधा गावात आणि परिसरात संतापाची लाट पसरली आहे. प्रशांतच्या हत्येनंतर त्याच्या मृतदेहाचे फोटो त्याच्याच मोबाईल वरून पाठवले गेले, कॉल हिस्ट्री गायब झाली आणि तरीही पोलिसांना एकही आरोपी सापडला नाही, यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुलीच्या काकांनी दिलेल्या धमकी पासून ते प्रशांतच्या मित्राच्या संशयास्पद भूमिके पर्यंत अनेक धागेदोरे तपासात समोर येऊ शकतात, पण पोलिसांची प्रगती शून्य असल्याने कुटुंब आणि गावकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे.
प्रशांतच्या कुटुंबाने आता कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. फॉरेन्सिक अहवाल आणि सीडीआरच्या आधारे तपासाला गती मिळण्याची त्यांना आशा आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आश्वासनानंतर या प्रकरणात काही प्रगतीहोईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. प्रशांतला न्याय मिळेल की त्याची आई मुक्ताबाई यांची फरफट असंच सुरू राहील, हे येणारा काळच ठरवेल.