कोरची पोलिसांचा अवैध दारूविरोधात दणका: 16 लाखांचा मुद्देमाल जप्त, मुख्य आरोपी फरार

कोरची, 12 एप्रिल : गडचिरोली जिल्ह्यातील कोरची पोलिसांनी अवैध दारूच्या वाहतुकी विरोधात मोठी कारवाई करत 16 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या मध्ये 9 लाख 97 हजार रुपये किमतीच्या विविध ब्रँडच्या इंग्रजी दारूसह एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात वाहन चालकाला अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.
कोरची पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, कोरची परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक होणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी देवरी–कोरची मार्गावर कसून सापळा रचला. रात्रीच्या सुमारास एक संशयास्पद बोलेरो वाहनदिसताच पोलिसांनी त्याची झडती घेतली. वाहनात मुरमुरे (भाताचे तूस) च्या पोत्यां खाली लपवलेल्या 100 बॉक्स इंग्रजी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या दारूमध्ये विविध महागड्या ब्रँडच्या बाटल्यांचा समावेश होता, ज्याची एकूण किंमत 9 लाख 97 हजार रुपये आहे.
पोलिसांनी वाहन चालकाला तात्काळ ताब्यात घेतले आणि वाहनासह सर्व मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेल्या माला मध्ये दारूसह बोलेरो वाहनाचा समावेश असून, त्याची एकूण किंमत 16 लाख रुपये आहे. या कारवाईने अवैध दारूच्या व्यापाराला गडचिरोली जिल्ह्यात मोठा हादरा बसला आहे.
पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांनी सांगितले की, या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण बुंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. मुख्य आरोपी फरार असून, त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. तसेच, या अवैध दारूच्या रॅकेटशी संबंधित इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत.
ही कारवाई गडचिरोली जिल्ह्यातील अवैध धंद्यां विरोधात पोलिसांच्या कठोर भूमिकेचे द्योतक आहे. स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून, अशा कारवायां मुळे बेकायदा व्यवसायांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.