कुरखेड्यातील विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम : बस स्थानकावर चावडी वाचनाची जादू

Screenshot
कुरखेडा, १२ एप्रिल २०२५ : आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेद्वारा संचालित श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, कुरखेडा येथील इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांनी निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला. कुरखेडा बस स्थानकावर आयोजित चावडी वाचनात या चिमुकल्यांनी साहित्यिक पुस्तके आणि विविध विषयांवरील साहित्य वाचून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे आणि गणिताच्या मूलभूत संकल्पना रंजक पद्धतीने समजावून देणे हा होता. बस स्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी आयोजित या कार्यक्रमाने प्रवाशांनाही सकारात्मक संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागाने वातावरण प्रसन्न झाले.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य नागेश्वर फाये, बसस्थानक प्रमुख श्रीधर शिवणकर, शिक्षक वासुदेव मस्के, राजेंद्र पंधरे, संजयशिरपूरवार, पालक राजू प्रधान यांच्यासह अनेक प्रवासी आणि विद्यार्थी उपस्थित होते. “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचाआत्मविश्वास वाढतो आणि वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळते,” असे प्राचार्य फाये यांनी सांगितले.
हा उपक्रम केवळ शिक्षणापुरता मर्यादित न राहता सामाजिक जागरूकतेचे ही माध्यम बनला. भविष्यात असे उपक्रम अधिक ठिकाणी राबवले जावेत, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.