गडचिरोलीत पीएम जनमन योजनेला गती: जिल्हाधिकाऱ्यांचे घरकुले, रस्ते आणि पायाभूत सुविधांसाठी कठोर निर्देश

गडचिरोली, १३ एप्रिल : – प्रधानमंत्री जनजातीय महा न्याय अभियान (पीएम जनमन) अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात विकास कामांना गती देण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज महत्त्वपूर्ण पावले उचलली. दूरदृष्टी प्रणाली द्वारे आयोजित जिल्हास्तरीय बैठकीत त्यांनी प्रलंबित घरकुले, रस्ते, बहुउद्देशीय केंद्रे आणि अन्य पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावाघेत अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यात ८३२१ घरकुलांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून ६८६६ लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. मात्र, केवळ ४४८ घरकुले पूर्ण झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मुरूम आणि वाळूच्या उपलब्धतेची खबरदारी घेत पावसाळ्यापूर्वी सर्व घरकुले पूर्ण करण्याचे आदेश दिले.
आदिवासी पाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामांनाही चालना देण्यासाठी पंडा यांनी वन विभागाच्या परवानग्या तातडीने मिळवून १ मे पूर्वी उमनूर–करंचा, काळेड़–लोवा, पाटीगावसह अन्य रस्त्यांची कामे सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच, २३ मंजूर बहुउद्देशीय केंद्रां पैकी प्रलंबित बांधकामांना तात्काळ सुरुवात करण्याचे सांगितले.
जल जीवन मिशन, पोषण अभियान, समग्र शिक्षण, वनहक्क पट्टे, दूरसंचार आणि आरोग्य सेवांसारख्या योजनांनाही गती देण्यावर भर देण्यात आला. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, उपविभागीय अधिकारी आणि अन्य विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या सक्रिय पुढाकारामुळे गडचिरोलीतील आदिवासी भागांच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.