कोरचीत प्रथमच बोधिसत्व धम्मज्ञान परीक्षेचे यशस्वी आयोजन

कोरची, १३ एप्रिल : भारतीय बौद्ध महासभेच्या राज्य शाखेने महाराष्ट्रात प्रथमच आयोजित केलेल्या राज्यस्तरीय बोधिसत्व धम्मज्ञान परीक्षेने कोरची तालुक्यात एक नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमाची पायाभरणी केली. पार्वताबाई विद्यालयात घेण्यात आलेल्या या परीक्षेत ३३ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. ही परीक्षा चार गटांत घेण्यात आली: गट १ (इयत्ता ५वी ते ७वी), गट २ (इयत्ता८वी ते १०वी), गट ३ (इयत्ता ११वी ते १२वी) आणि खुला गट (१८ वर्षांवरील व्यक्ती).
परीक्षेत ५० वस्तुनिष्ठ प्रश्न असून, सकाळी १० ते ११ या एक तासाच्या कालावधीत ती पार पडली. किमान ३५ टक्के गुण मिळवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र आणि प्रत्येक गटातून जिल्हावार २४ पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. विशेष म्हणजे, ही परीक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६५ वर्षांच्या जीवनकार्यावरील ६५ विषयांवर आधारित होती. “प्रश्नोत्तरातून समग्रडॉ. बाबासाहेब आंबेडकर” या ग्रंथातील ४२२५ प्रश्नांमधून प्रत्येक गटासाठी वेगवेगळी प्रश्नावली तयार करण्यात आली होती.
पार्वताबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक हरीशचंद्र मडावी यांनी सभागृह उपलब्ध करून दिले, तर मुन्शीलाल अंबादे यांनी व्यवस्थापनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. परीक्षेच्या यशस्वी आयोजनात लालचंद जनबंधू (केंद्र संचालक), हरीशचंद्रभोवते (सहायक केंद्र संचालक) आणि ओमराव टेंभुर्ने (केंद्र निरीक्षक) यांचे मोलाचे योगदान लाभले. या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत त्यांच्या बौद्धिक विकासाला चालना दिली.
कोरचीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसेली, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोरची, रियल कॉन्व्हेंट कोरची येथील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये डॉ. आंबेडकरांच्या विचारांची आणि कार्याची ओळख निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
हा उपक्रम केवळ परीक्षा न राहता, विद्यार्थ्यांना सामाजिक जाणिवांचा वारसा आणि बौद्धिक प्रेरणा देणारा ठरला. कोरचीतील या यशस्वी आयोजनाने राज्यभरातील इतर तालुक्यांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.