April 25, 2025

गडचिरोलीत रक्तरंजित घटना: निवृत्त अधिकाऱ्याचा खून!”

गडचिरोलीत निवृत्त महिला अधिकाऱ्याची भरदिवसा निर्घृण हत्या: आंदोलनानंतरचा खळबळजनक खुलासा!

गडचिरोली, १४ एप्रिल : शहरालगतच्या नवेगाव (मुरखळा) येथे आज दुपारी एका भयंकर घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली. जिल्हा परिषदेच्या निवृत्त अधिकारी कल्पना केशव उंदिरवाडे (वय ६१) यांची लोखंडी रॉडने मारहाण करून क्रूरपणे हत्या करण्यात आली. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरी काम करणाऱ्या महिलेने त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घराचे दरवाजे उघडे, टीव्ही सुरू आणि शरीरावर मारहाणीच्या जखमा यामुळे हत्येचा थरार आणखी गूढ बनला आहे.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून एका संशयिताला ताब्यात घेतले असून, पोलीस अधीक्षक नीलोत्पल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनात तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पण या हत्ये मागील कारण काय? हा प्रश्न संपूर्ण गडचिरोलीला अस्वस्थ करत आहे.

आंदोलनाशी संबंध? की वैयक्तिक वैमनस्य?

कल्पना उंदिरवाडे आणि त्यांचे पती केशव हे दोघेही जिल्हा परिषदेत मान्यवर अधिकारी होते. केशव यांचे काही वर्षां पूर्वी निधन झाले, तर कल्पना तीन वर्षांपूर्वी निवृत्त झाल्या. त्यांना एक मुलगी आणि एक दत्तक मुलगा आहे. विशेष म्हणजे, त्यांचा मुलाला गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरी मिळावी यासाठी त्या सातत्याने प्रयत्न करत होत्या. याच संदर्भात ११ आणि १२ एप्रिलला बँकेच्या नोकरभरतीतील कथित अनियमितते विरुद्ध झालेल्या धरणे आंदोलनात त्या सक्रियपणे सहभागी झाल्या होत्या. आंदोलन संपल्या नंतर अवघ्या २४ तासांत त्यांची हत्या झाल्याने या दोन्ही घटनांमध्ये संबंध असल्याची शक्यता उपस्थित होत आहे. स्थानिकांमध्येही या बाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

चोरी नाही, मग हत्येचा हेतू काय?

धक्कादायक बाब म्हणजे, कल्पना यांच्या अंगावरील सोन्याच्या तीन अंगठ्या आणि इतर दागिने तसेच होते. यामुळे चोरीसाठी हत्या झाली नसल्याचे स्पष्ट आहे. मग हत्येचा हेतू काय? जवळचा व्यक्ती यात सामील आहे का? की आंदोलना मुळे कोणाला त्यांचा राग आला? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असले, तरी त्याची ओळख आणि हत्येचे कारण याबाबत गूढ कायम आहे.

पोलिसांचा तपास काय सांगतो?

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे आणि पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या पथकाने घटनास्थळाचा कसूनत पास सुरू केला आहे. पंचनामा पूर्ण झाला असून, मृतदेह शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. पोलिसांनी जवळच्या सीसी टीव्ही फुटेज आणि इतर पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, कल्पना यांचा जावई, जो चामोर्शी मार्गावरील पेट्रोल पंपवर काम करतो, तोही घटनास्थळी पोहचला होता.

जिल्ह्यात तणावाचे वातावरण

ही हत्या केवळ एक गुन्हा नसून, त्या मागे सामाजिक आणि राजकीय संदर्भ असू शकतात, अशी चर्चा गडचिरोलीत सुरू आहे. कल्पना उंदिरवाडे यांच्या हत्येने निवृत्त अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, तर पोलिसांवर या प्रकरणाचा त्वरित उलगडा करण्याचा दबाव वाढत आहे.

या हत्येचा खुलासा कधी होणार? आणि खरा गुन्हेगार कोण? याकडे आता साऱ्या गडचिरोलीचे लक्ष लागले आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!