कुरखेड्यात अतिक्रमणाचा किल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा वादळी फतवा! १२ मीटर रस्त्याच्या मोजणीचे आदेश, नगर पंचायतीवर कारवाईची तलवार!

कुरखेडा, १८ एप्रिल : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील १२ मीटर सर्व्हिस रोडवरील अवैध नाली बांधकाम आणि अतिक्रमणाचा मुद्दा आता तापला आहे. नगर पंचायतीच्या कथित निष्क्रियतेने वैतागलेल्या नागरिकांच्या तक्रारींनी जिल्हा प्रशासनाला खडबडून जागे केले आहे. जिल्हाधिकारी अविष्यंत पांडा यांच्या निर्देशानुसार जारी तातडीच्या पत्राने खळबळ उडवली आहे. या पत्रात उपअधीक्षक, भू–अभिलेख कार्यालय, कुरखेडा यांना १२ मीटर रस्त्याची त्वरित मोजणी आणि सीमांकनाचे आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू होईल. हा निर्णय नागरिकांसाठी न्यायाच्या दिशेने मोठे पाऊल आहे.
कुरखेडा नगर पंचायतीच्या प्रभाग क्र. ९, गांधी वॉर्ड येथील पेट्रोल पंपा पासून श्यामराव तुलावी यांच्या घरा पर्यंतच्या १२ मीटर रस्त्यावर अतिक्रमणाच्या तक्रारी गंभीर होत्या. डॉ. भैयालाल राऊत आणि इतर रहिवाशांनी ६ मार्च आणि ८ एप्रिल २०२५ रोजी तक्रारी दाखल करून नगर पंचायतीवर प्रभावशाली अतिक्रमणधारकांना पाठबळ दिल्याचा आरोप केला. यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतूक आणि दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. नागरिकांच्या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी १५ एप्रिल रोजी हस्तक्षेप केला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्रात (क्र. कार्या–१०(१)/नपाप्र/कावि/१८२/२०२५) सर्वे क्र. ७५, ७४/१, ७७ आणि ६९ मधील १२ मीटररस्त्याची मोजणी वडसा–कुरखेडा मुख्य रस्त्यापासून करण्याचे निर्देश आहेत. मोजणी आणि सीमांकनानंतर अतिक्रमण हटवण्याची कारवाई त्वरित होईल, असे पत्रात नमूद आहे. हा आदेश नगर पंचायतीच्या नाकर्तेपणावर कठोर प्रहार आहे.
नागरिकांनी या पावलाचे स्वागत केले. “जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आमच्यासाठी दिलासा आहे,” असे एका रहिवाशाने सांगितले. १७ एप्रिलची सुनावणी पाणी टंचाईच्या बैठकीमुळे स्थगित झाली, तरी हे पत्र आशेचा किरण आहे. हा प्रश्न प्रशासनाच्या विश्वासार्हतेचा आहे. आता सर्वांचे लक्ष मोजणी आणि कारवाईवर आहे.