आनंद गुरुकुल: महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ

मुंबई, २१ एप्रिल : महाराष्ट्र शासनाने राज्यातील शिक्षण क्षेत्रात क्रांतीकारी पाऊल उचलत “आनंद गुरुकुल (विशेष नैपुण्य) निवासी शाळा’ स्थापन करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार (क्र. नमाशा-1425/प्र.क्र.49/एसएम-2), राज्यातील 8 शैक्षणिक विभागांत प्रत्येकी एक, अशा एकूण 8 शाळा इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उभारल्या जाणार आहेत. प्रत्येक शाळेत 200 विद्यार्थ्यांची क्षमता असेल आणि शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून त्या कार्यान्वित होणार आहेत. या शाळांचा उद्देश 21व्या शतकाच्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना विशेष कौशल्यांचे शिक्षण देऊन उच्च दर्जाचे मनुष्यबळ निर्माण करणे आहे.
या शाळा नियमित अभ्यासक्रमा सोबत क्रीडा, कला, शास्त्र, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, अपारंपरिक ऊर्जा, संवाद कौशल्य, आर्थिकसेवा, व्यवस्थापन, आरोग्य सेवा, जागतिक पर्यटन, शाश्वत विकास यांसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्ये विशेष नैपुण्य शाखांचे शिक्षण देतील. यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरसाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करता येतील आणि त्यांचा सर्वांगीण विकास साधला जाईल. या शाळांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या पूर्णपणे निवासी असतील, जिथे विद्यार्थ्यांना शिक्षणा सोबतच राहण्याच्या सुविधा, प्रयोगशाळा, संगणक कक्ष आणि सभागृह उपलब्ध असतील.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी शासनाने आयुक्त (शिक्षण), पुणे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट नेमला आहे. हा गट शाळांचे स्थळ निश्चित करणे, विशेष नैपुण्य अभ्यासक्रम तयार करणे, प्रवेश पद्धती ठरविणे आणि शाळांची कार्यपद्धती व मार्गदर्शकतत्त्वे निश्चित करणे या बाबींचा अभ्यास करेल. धुळे, संभाजीनगर, यवतमाळ, सातारा आणि अमरावती येथील शासकीय विद्यानिकेतनांचा वापर केला जाईल, तर उर्वरित तीन विभागांत सुविधायुक्त शाळांची निवड होईल. तसेच, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या नेतृत्वाखाली उपसमिती विशेष अभ्यासक्रम आणि कार्यपद्धतीचा सविस्तर अहवाल तयार करेल.
या शाळांच्या स्थापनेसाठी विद्यमान सुविधांचे मूल्यांकन, वर्ग खोल्या, प्रयोगशाळा, निवास व्यवस्था आणि आवश्यक अतिरिक्त निधीयांचा प्रस्ताव शासनाला सादर केला जाईल. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळेल आणि राज्यात शाश्वत विकासाला चालना मिळेल.
“आनंद गुरुकुल” शाळा महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात नवा अध्याय रचतील, अशी अपेक्षा आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना भविष्याच्या आव्हानांसाठी सज्ज करता येईल आणि देशाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देता येईल.